सुफी फंडच्या नावाखाली ‘बंटी-बबली’ने तब्बल ३४२ लोकांना घातला गंडा

By योगेश पांडे | Published: December 6, 2022 04:51 PM2022-12-06T16:51:36+5:302022-12-06T16:52:53+5:30

फसवणुकीचा गुन्हा दाखल

342 people cheated over 60 lakhs in the name of Sufi fund in Nagpur | सुफी फंडच्या नावाखाली ‘बंटी-बबली’ने तब्बल ३४२ लोकांना घातला गंडा

सुफी फंडच्या नावाखाली ‘बंटी-बबली’ने तब्बल ३४२ लोकांना घातला गंडा

googlenewsNext

नागपूर : गुंतवणूकीवर जास्त व्याज परताव्याचे आमिष दाखवून नागपुरातील एका दांपत्याने थोड्याथोडक्या नव्हे तर ३४२ लोकांना गंडा घातल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्राथमिक तपासानंतर या ‘बंटी-बबली’ने लोकांची ६० लाखांची फसवणूक केल्याचा आकडा निघाला आहे. मात्र ही रक्कम कोटींमध्ये जाऊ शकते, असा पोलिसांचा अंदाज आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.

अशोकनगर, सिद्धी कॉलनी येथे राहणारे जितेंद्रनाथ उर्फ जितू लल्लुराम गुप्ता (४४) व त्याची पत्नी अंजना उर्फ अंजू (३८) अशी आरोपींची नावे आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्यांनी नागरिकांना फंडच्या जाळ्यात अडकवायची योजना आखली. त्यांनी सुफी फंड या नावाने गुंतवणूक योजना तयार केली. यात दैनंदिन तसेच इतर गुंतवणूकीचे पर्याय होते. त्यांनी अगोदर पाचपावलीतील अशोकनगरातील गोंड मोहल्ल्यात कार्यालय थाटले. त्यानंतर शहरातील विविध भागातील नागरिकांनी संपर्क केला व बॅंकांपेक्षा जास्त व्याजदर मिळेल असे आमिष दाखविले.

त्यांनी विविध माध्यमांतून नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढले व ३४२ लोकांकडून ६० लाख ६७ हजार रुपये गोळा केले. मात्र रकमेचा परतावा देण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी विविध कारणे सांगण्यास सुरुवात केली. गुंतवणूकदारांनी काही काळ संयम दाखविला. मात्र त्यानंतर परत गुंतवणूकदार गेले असता पती-पत्नीने अश्लिल शिवीगाळ करत धमकी देण्यास सुरुवात केली.

नोव्हेंबर २०१९ ते डिसेंबर २०२० या कालावधीत त्यांनी लोकांकडून पैसे उकळले. यासंदर्भात महेश लोटनप्रसाद गुप्ता (५१) यांनी पोलिसांत तक्रार केली. पाचपावली ठाण्यातील पथकाने प्राथमिक चौकशी करून गुप्ता दांपत्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी जितू गुप्ताला अटक केली आहे.

Web Title: 342 people cheated over 60 lakhs in the name of Sufi fund in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.