नागपूर रेल्वेस्थानकावर ३४.५ किलो गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 09:13 PM2018-10-12T21:13:06+5:302018-10-12T21:14:26+5:30
रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री प्लॅटफार्म क्रमांक १ वर ३.४५ लाख रुपये किमतीचा ३४.५ किलो गांजा जप्त करून तीन आरोपींना अटक केली. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी रात्री प्लॅटफार्म क्रमांक १ वर ३.४५ लाख रुपये किमतीचा ३४.५ किलो गांजा जप्त करून तीन आरोपींना अटक केली. जप्त केलेला गांजा लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आला.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी मादक पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य अर्जुन सामंतराय शुक्रवारी रात्री १.४० वाजता गस्त घालत असताना त्यांना चार बॅग बेवारस स्थितीत आढळल्या. बॅगमध्ये स्फोटके असण्याची शक्यता असल्यामुळे बॅगची हँड मेटल डिटेक्टरने तपासणी केली असता त्यात काहीच आढळले नाही. त्यानंतर बॅगची स्कॅनिंग मशिनमध्ये तपासणी केली असता त्यात सात पाकीट असल्याचे आढळले. पाकिटात गांजा असल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्हीत तपासणी केली असता तीन आरोपींनी प्लॅटफार्म क्रमांक ३ वरून येऊन कमसम हॉटेलसमोर बॅग ठेवल्याचे दिसले. सीसीटीव्हीत रात्री ३ वाजता आरोपी प्लॅटफार्म क्रमांक २/३ च्या ब्रिजजवळ बसलेले दिसले. लगेच त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी आपले नाव इंद्रजित बैनामी (३०), रोहतास किसनलाल (२५) रा. अलिगड आणि दिगंबर अमरसिंह (३०) रा. मधुरा सांगितले. दुर्गवरून नागपूरला आल्याचे सांगून येथून मथुरा येथे जाणार होते, असे त्यांनी सांगितले. आरोपींना मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले.