नागपुरात साडेतीन कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी; औषध व्यावसायिकाला नऊ लाखांचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 10:09 AM2017-12-16T10:09:00+5:302017-12-16T10:09:35+5:30
साडेतीन कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी करून येथील एका औषध व्यावसायिकाला दोन आरोपींनी ८ लाख, ९१ हजारांचा गंडा घातला. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : साडेतीन कोटींची लॉटरी लागल्याची बतावणी करून येथील एका औषध व्यावसायिकाला दोन आरोपींनी ८ लाख, ९१ हजारांचा गंडा घातला. कोतवाली पोलीस ठाण्यात याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
हेमंत प्रभाकर मेंढे (वय ४२) असे फसगत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते औषधांचा (मेडिसिन) व्यवसाय करतात. २५ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता त्यांना एक फोन आला. आधी जेम्स मॉरगन आणि नंतर मोनिका नामक महिला पलीकडून बोलली. चेव्हरेट क्रूड आॅटो कंपनीतून बोलतो, असे सांगून आरोपींनी मेंढे यांचे आधी अभिनंदन केले. तुम्हाला ३ कोटी ६० लाख रुपयांची लॉटरी लागली आहे, असे आरोपींनी सांगितले. ही रक्कम तुमच्यापर्यंत कशी पाठवायची, अशी विचारणा करीत आरोपींनी मेंढेंकडून वेगवेगळी माहिती काढून घेतली. त्यानंतर त्यांना २९ नोव्हेंबरपर्यंत ई मेल पाठवून वेगवेगळ्या नावाखाली ८ लाख, ९१ हजार, ५०० रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले. प्रत्येक वेळी काही न काही कारण सांगून बँक खात्यात रक्कम जमा करण्यास बाध्य करणाऱ्या आरोपींचा संशय आल्यानंतर मेंढे यांनी आरोपींकडे लॉटरीच्या रकमेबाबत विचारणा केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत होते. नंतर आरोपींनी प्रतिसाद देणे बंद केल्यामुळे मेंढे यांना फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदवली. आरोपींचा शोध घेतला जात आहे.