नागपुरातील कोविड सेंटरवरील ३५ लाखांचा खर्च पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2020 08:40 PM2020-08-04T20:40:42+5:302020-08-05T01:17:06+5:30
नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, मनपा प्रशासनाने कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत ५ हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात ५०० बेड सज्ज ठेवले होते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात येथे रुग्णांना ठेवणे शक्य नसल्याने यावरील ३५ लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता, मनपा प्रशासनाने कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत ५ हजार बेड क्षमतेचे कोविड केअर सेंटर उभारण्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात ५०० बेड सज्ज ठेवले होते. परंतु पावसाळ्याच्या दिवसात येथे रुग्णांना ठेवणे शक्य नसल्याने यावरील ३५ लाखांचा खर्च पाण्यात गेला आहे.
स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी मंगळवारी या कोविड सेंटरला आकस्मिक भेट दिली. येथील २०० बेडवर गाद्या गुंडाळून ठेवल्या होत्या. पाणी गळत असल्याने अनेक बेड ओले झाल्याचे निदर्शनास आले. जोराचा पाऊस आल्यास शेडमध्ये ठिकठिकाणी पाणी गळते. परिसरात साचलेले पाणी शेडमधून वाहते. शौचालयाची व्यवस्था शेड बाहेर आहे. परंतु जोराचा पाऊस आल्यास तेथे जाणे शक्य होत नाही. येथील पलंग जंग खात आहेत. उषा, चादर व अन्य साहित्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला परंतु त्या व्यवस्थित ठेवलेल्या नाहीत, असे विदारक चित्र बघायला मिळाले. आतापर्यंत या सेंटर मध्ये एकही रुग्ण ठेवला नाही. येथे कोणत्याही स्वरूपाची व्यवस्था नसल्याची माहिती पिंटू झलके यांनी दिली.
पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता खर्च
शहरात कोविड सेंटरसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना नागपूरपासून २५ किलोमीटर अंतरावरील राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेत कोविड सेंटर उभारण्यात आले. परंतु येथे कुठल्याच स्वरूपाच्या सुविधा नाहीत. सेंटर उभारताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप पिंटू झलके यांनी केला.
खर्चाची चौकशी व्हावी
मनपा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे कोविड सेंटर वरील ३०-३५ लाखाचा खर्च पाण्यात गेला आहे. राधास्वामी सत्संग मंडळाच्या जागेवरील सेंटर प्रमाणेच नागपूर शहरातील मनपाच्या पाच रुग्णालयातील कोविड सेंटरची अशीच अवस्था आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी झलके यांनी केली.