३५ टक्के लाेकसंख्या झाेपडपट्ट्यांमध्ये, २५ टक्के बीपीएल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:07 AM2021-07-11T04:07:51+5:302021-07-11T04:07:51+5:30

नागपूर : शहराचा हाेणारा विकास, त्यातून राेजगारासाठी शहराकडे हाेणारे स्थलांतर आणि त्यामुळे झाेपडपट्ट्यांमध्ये वाढ हाेणे, हे एकमेकांशी जुळले आहे ...

35% of the population in slums, 25% in BPL | ३५ टक्के लाेकसंख्या झाेपडपट्ट्यांमध्ये, २५ टक्के बीपीएल

३५ टक्के लाेकसंख्या झाेपडपट्ट्यांमध्ये, २५ टक्के बीपीएल

Next

नागपूर : शहराचा हाेणारा विकास, त्यातून राेजगारासाठी शहराकडे हाेणारे स्थलांतर आणि त्यामुळे झाेपडपट्ट्यांमध्ये वाढ हाेणे, हे एकमेकांशी जुळले आहे आणि नागपूरही त्याला अपवाद नाही. गेल्या दशकभरात शहरात झाेपडपट्ट्यांची आणि त्यात राहणाऱ्यांची लाेकसंख्याही वाढली आहे. शहरात अधिकृत व अनधिकृत अशा ४२६ झाेपडपट्ट्यांमध्ये ८ लाखांच्यावर म्हणजे ३५ टक्के लाेकसंख्या राहते. त्यातील २५ टक्के दारिद्र्य रेषेच्या खाली आहेत.

गेल्या दशकभरात नागपूर शहराचा हाेत चाललेला विकास आणि वाढत चाललेला आकार लाेकसंख्या वाढीसाठी कारणीभूत ठरला आहे. गेल्या तीन दशकाच्या जनगणनेवर नजर टाकली असता २०२१ मध्ये हाेणाऱ्या जनगणनेत नागपूर जिल्ह्याची लाेकसंख्या ५० लाखाच्या पार जाण्याचा अंदाज आहे. अशात मध्य भारतातील गावागावातून स्थलांतरितांचा ओढा नागपूरकडे सातत्याने वाढत असल्याने ताे भारही वाढला आहे. हा लाेंढा मग झाेपडपट्ट्यांमध्ये सामावून घेतला जाताे. शहरात गेल्या १५ वर्षात ४०० च्यावर स्लम एरिया निर्माण झाले. यात २९९ नाेंदणीकृत आणि १२७ अनधिकृत झाेपडपट्ट्यांची संख्या आहे. २०११ च्या गणनेत अधिकृत झाेपड्यांमध्ये ६ लाख ६९ हजार ९९६ लाेक तर अनधिकृत १ लाख ३५ हजार २२६ लाेकसंख्या हाेती. अशी एकूण ८ लाख ५ हजार २२२ लाेक झाेपडपट्ट्यांमध्ये राहत हाेते. त्यावेळी बीपीएल कार्डधारक कुटुंबांची संख्या ९२२३६ म्हणजे ५ लाख ८७ हजार ४९० लाेकसंख्या दारिद्र्य रेषेखाली हाेती. दहा वर्षात या संख्येमध्ये आणखी वाढ नाकारता येत नाही. यामध्ये रिक्षाचालक, बांधकाम मजूर, कामगार, माेलकरणी, भाजी विक्रेते अशा घटकांचा समावेश आहे.

काेराेना काळात या घटकांवर माेठा परिणाम झाला आहे. पहिल्या व दुसऱ्या वर्षीच्या लाॅकडाऊन काळात माेठ्या संख्येने स्थलांतरित मजूर त्यांच्या राज्यांकडे परतले. मात्र त्यांचा घराेबा अद्याप येथे आहे. एका सर्वेक्षणानुसार या काळात बेराेजगारांची व गरिबांची संख्या वाढली आहे.

- २०११ च्या सर्वेक्षणात झाेननिहाय स्लम व लाेकसंख्या

झाेन नाेटीफाईड स्लम अननाेटीफाईड स्लम एकूण लाेकसंख्या

लक्ष्मीनगर २८ २० ६०६७२

धरमपेठ २३ १३ ६१४२८

हनुमाननगर २८ ८ ६०९२७

धंताेली २० ७ ४९६४२

नेहरूनगर १७ ८ ५३३१५

गांधीबाग २३ ५ ९५८६९

सतरंजीपुरा ३६ ९ १,१०,३१५

लकडगंज ४७ ७ १,३२,६०९

आशीनगर ४४ २९ १,०३,४९२

मंगळवारी ३१ २१ ७५८८१

एकूण २९९ १२७ ८,०५,२२२

Web Title: 35% of the population in slums, 25% in BPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.