सुंदर महिलांचा वापर व परताव्याचे आमिष दाखवून ३५० कोटी लुबाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 10:24 AM2021-08-09T10:24:43+5:302021-08-09T10:54:01+5:30
Nagpur News दहा दिवसातच एक लाखाचे १.३० लाख रुपये परत करण्यासह अनेक आमिषे दाखवून इबिड ट्रेडर्सच्या नावाखाली सुनील कडियाला या ठकबाजाने देशभरातील लोकांची ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेने फसवणूक केली आहे.
जगदीश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दहा दिवसातच एक लाखाचे १.३० लाख रुपये परत करण्यासह अनेक आमिषे दाखवून इबिड ट्रेडर्सच्या नावाखाली सुनील कडियाला या ठकबाजाने देशभरातील लोकांची ३५० कोटींपेक्षा अधिक रकमेने फसवणूक केली आहे. नागपूरमध्ये एकाच वर्षात दोन कार्यालये उघडून २५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम त्याने हडपली. सुनील कडियाला, त्याचा साथीदार शेखर कुमार आणि स्वाती लक्षणे यांना बालाघाट येथून अटक करण्यात आली आहे.
कडियाला, त्याची पत्नी, साडभाऊ, भाऊ आणि त्याची पत्नी हे या रॅकेटचे सूत्रधार आहेत. सुनील मूळचा आंध्रप्रदेशातील अनंतपुरमचा रहिवासी आहे. त्याने २०२० मध्ये कळमनाच्या ओमनगरात तसेच १५ आॅगस्ट २०२० रोजी माटे चौकात कार्यालय सुरू केले. तो १० दिवसात गुंतवणुकीवर ३० टक्के किंवा ३५ दिवसात ४५ टक्के अतिरिक्त रक्कम परत करण्याचे आमिष दाखवित होता. सुरुवातीला त्याने रक्कम परत केल्यामुळे इबिड ट्रेडिंगची माहिती सगळीकडे पसरली. डिसेंबर २०२० नंतर कोरोना आणि दुसरे कारण सांगून त्याने पैसे देणे बंद केले. अनंतपुरममध्ये ३०० कोटींपेक्षा अधिक रक्कम हडपली. एप्रिल २०२१ मध्ये अनंतपुरम पोलिसांनी कडियाला आणि त्याच्या कुटुंबीयांसह १३ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. नागपूरवरून फरार झाल्यानंतर कडियालाने रायपूरमध्ये चांपा येथे कार्यालय सुरू केले. सुनीलजवळ मर्सिडिज, जग्वार, फॉर्च्युनरसारख्या सात-आठ लक्झरी कारचा काफिला असल्यामुळे गुंतवणूकदार त्याला मोठा व्यक्ती समजत होते. १५ दिवसांपूर्वी निखिल वासेने १२ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर इतर पीडितही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले. बजाजनगर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली असता कडियाला आणि इतर दोघे बालाघाटमध्ये पोलिसांच्या हाती लागले.
सुंदर महिलांचा वापर
कडियाला नागरिकांना फसविण्यासाठी सुंदर महिलांना व्यवस्थापक आणि एजंट म्हणून नियुक्त करीत होता. एखाद्याने गुंतवणूक करण्यास नकार दिल्यास या महिला त्याची भेट घेऊन त्याला गुंतवणुकीस प्रवृत्त करीत होत्या. पैशांसाठी दबाव टाकल्यास या सुंदर महिला त्यांना शांत करण्याचे काम करीत होत्या. यामुळे अनेक गुंतवणूकदार फसवणूक झाल्यानंतरही तक्रार करण्यासाठी धजावत नसल्याची स्थिती आहे.
गुंतवणूकदाराची आत्महत्या
आरोपींनी फसवणूक केल्यामुळे कळमनातील एका व्यक्तीने चार महिन्यांपूर्वी आत्महत्या केली आहे. त्याने १० वर्षात जमविलेले पैसे आरोपींनी हडपले. प्रयत्न करूनही त्याला पैसे परत करण्यात येत नव्हते. त्यामुळे हताश होऊन त्याने आत्महत्या केली. पोलिसांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.