नागपुरातील नाले दुरुस्तीचा ३५० कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 09:06 PM2018-12-11T21:06:11+5:302018-12-11T21:08:45+5:30
पावसाळ्याच्या दिवसात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पुराचे पाणी वस्त्यात शिरते. नाल्यातील दूषित पाण्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका विचारात घेता शहरातील नाल्यांची दुरुस्ती, खोलीकरण व संरक्षण भिंत घालण्याबाबतचा ३५० कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करून कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. हा प्रस्ताव निधीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाळ्याच्या दिवसात शहरातून वाहणाऱ्या नाल्यांचे पुराचे पाणी वस्त्यात शिरते. नाल्यातील दूषित पाण्याची दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या आरोग्याला निर्माण झालेला धोका विचारात घेता शहरातील नाल्यांची दुरुस्ती, खोलीकरण व संरक्षण भिंत घालण्याबाबतचा ३५० कोटींचा प्रकल्प अहवाल तयार करून कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. हा प्रस्ताव निधीसाठी राज्य सरकारकडे पाठविला जाणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसंवाद कार्यक्रमात नागरिकांनी शहरातून वाहणाऱ्या नाल्यांची समस्या मांडली. शहरातील सर्वच भागात ही समस्या आहे. याचा विचार करता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचा विस्तृत असा ३५० कोटींचा अहवाल तयार करून राज्य सरकारकडे पाठविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले.
मे पर्यंत एक लाख एलईडी बसविणार
शहरातील पथदिवे बदलवून १ लाख ४० हजार एलईडी दिवे लावण्याचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. परंतु गतकाळात हे काम संथ होते. यात काही अडचणी होत्या. जेमतेम ४० हजार एलईडी लावण्यात आले. या कामात गती आणून मे २०१९ पर्यंत शहरात एक लाख एलईडी लावण्याचे निर्देश विद्युत विभागाला देण्यात आल्याची माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली. करारानुसार कंत्राटदारांनी डिसेंबर २०१८ पर्यंत १.४० लाख एलईडी लावणे अपेक्षित होते. यावर २१७ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मात्र अडचणीमुळे शक्य झाले नाही, अशी माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता एस.बी. जैस्वाल यांनी दिली.
खड्डे बुजवण्यासाठी ५ कोटींची तरतूद
पावसाळ्याच्या दिवसात शहरातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडतात. जेट पॅचर मशीनच्या साहाय्याने खड्डे बुजविले जातात. खड्डे दुरुस्तीसाठी अर्थसंकलपात ५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. शहरातील डांबरी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम जेट पॅचर मशीनच्या माध्यमातून करण्यात येते. खड्डे बुजवण्यासाठी तरतूद केली जाते. विभागाकडून खड्डे बुजवण्याचा दावाही के ला जातो. प्रत्यक्षात शहरातील रस्त्यांवर खड्डे कायम असल्याचे चित्र आहे.