नागपुरातील मोमिनपुरा व डोबीनगर येथील ३५० लोकांना केले क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 09:12 PM2020-05-04T21:12:22+5:302020-05-05T00:33:56+5:30
कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात सतरंजीपुरापाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा व डोबीनगर परिसरात संसर्गाला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने या परिसरातील ३५० नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी डोबीनगर परिसरातील १०० नागरिकांना तर मोमिनपुरा परिसरातील २५० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये नागपुरात सतरंजीपुरापाठोपाठ हॉटस्पॉट ठरलेल्या मोमिनपुरा व डोबीनगर परिसरात संसर्गाला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासनाने या परिसरातील ३५० नागरिकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोमवारी डोबीनगर परिसरातील १०० नागरिकांना तर मोमिनपुरा परिसरातील २५० नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले.
डोबीनगर परिसरात एक गरोदर महिला बाधित असल्याचे आढळून आले. या महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोमिनपुरा परिसरात २० बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. या लोकांना क्वारंटाईन करणे आवश्यक असल्याने मनपा प्रशासनाने हा निर्णय घेतला. मोमिनपुरा परिसरातून याहून अधिक लोकांना क्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत लोकांना क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू होती. याआधी सतरंजीपुरा परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन करण्यात आले.
त्या पाठोपाठ मोमिनपुरा परिसरातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. हा आकडा ७०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या परिसरातील नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य केले. इतक्या मोठ्या प्रमाणात क्वारंटाईन केले जात असताना कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. हॉटस्पॉट ठरलेल्या भागात मनपाच्या आरोग्य विभागाची चमू दररोज सर्वेक्षण करीत आहे. नागरिकांना त्यांची इत्थंभूत माहिती विचारीत आहे. परंतु लोकांना क्वारंटाईन करण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याने ही प्रक्रिया सुरू आहे.