वन्य प्राण्यांसाठी ३५० पाणवठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 11:29 PM2018-04-20T23:29:20+5:302018-04-20T23:29:46+5:30
पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर, उमरेड-पवनी-करहांडला तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा स्रोत कमी झाल्यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम अशा एकूण ३५० पाणवठ्याद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्र संचालक आर. एस. गोवेकर यांनी गुरुवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या पेंच, बोर, उमरेड-पवनी-करहांडला तसेच टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यातील वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्यांचा स्रोत कमी झाल्यामुळे नैसर्गिक तसेच कृत्रिम अशा एकूण ३५० पाणवठ्याद्वारे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्र संचालक आर. एस. गोवेकर यांनी गुरुवारी दिली.
व्याघ्र प्रकल्प तसेच अभयारण्यामध्ये असलेले नैसर्गिक पाणवठे एप्रिल महिन्यापासून कोरडे पडायला सुरुवात होते. त्यामुळे वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सहज उपलब्धता व्हावी यासाठी विशेष पाणवठे तयार करण्यात आले आहेत. या संपूर्ण क्षेत्रात नैसर्गिक १७९ पाणवठ्यांपैकी ७६ पाणवठ्यांवर बारमाही पाणी उपलब्ध आहे. माहे एप्रिल अखेरपर्यंत ६२ पाणवठ्यांवर एप्रिलपर्यंत व १६ पाणवठ्यांवर मेपर्यंत पाण्याची उपलब्धता राहते. यापैकी १२३ पाणवठ्यांवरर सोलर पंपाद्वारे पाणी पुरवठा सुरु असून १९ पाणवठ्यांवर हॅण्डपंपाद्वारे पाणी पुरवठा होत असल्याचे क्षेत्र संचालक आर. एस. गोवेकर यांनी सांगितले.
कृत्रिम पाणवठ्यांवर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून यामध्ये ६१ पाणवठ्यांवर शासकीय टँकरद्वारे तर १३७ पाणवठ्यांवर भाडेतत्वावरील ७ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. माहे एप्रिल ते जून या कालावधीत कृत्रिम पाणवठ्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी २० टँकरची आवश्यकता भासणार असून त्यादृष्टीने संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे. संरक्षित क्षेत्रात बंद पडलेल्या सोलर पंपाची दुरुस्ती तसेच ३१ बोअरवेलवर नवीन सोलरपंप बसविण्यात आले आहे. वन्य प्राण्यांना संरक्षित क्षेत्रातच पाणी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
पेंच व्याघ्र पकल्प, तोतलाडोह, पेंच नदी, लोअर पेंच नदीच्या पात्रातील संलग्न असून उमरेड-पवनी-करहांडला अभयारण्य गोसेखुर्द प्रकल्पाजवळ आहे. तसेच बोर व्याघ्र प्रकल्प बोर धरणाजवळ असल्यामुळे वन्य प्राण्यांसाठी कायमस्वरुपी पाण्याची सोय सहज उपलब्ध आहे. यामुळे या परिसरात इतर व्याघ्र प्रकल्पाच्या तुलनेत कायमस्वरुपी पाण्याचे स्रोत सहजपणे उपलब्ध असतात. वन्य प्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी तात्काळ उपाययोजना सुरु करण्यात आल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पातील वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक आर. एस. गोवेकर यांनी दिली.