डेंग्यू संशयितांचे ३५०० नमुने प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:08 AM2021-09-19T04:08:29+5:302021-09-19T04:08:29+5:30
नागपूर : शहरात डेंग्यूने उच्चांक गाठला आहे. ९ वर्षांत प्रथमच सर्वाधिक, ७०८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण ...
नागपूर : शहरात डेंग्यूने उच्चांक गाठला आहे. ९ वर्षांत प्रथमच सर्वाधिक, ७०८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वत्र भीतीचे वातावरण असताना मनपाच्या प्रयोगशाळेत डेंग्यूचे निदान करणाऱ्या किटचा तुटवडा पडला आहे. ३५०० नमुने प्रलंबित असल्याची माहिती आहे.
लांबलेला पाऊस, जागोजागी साचलेले पाणी, घरेच्याघरे बनलेले डासांच्या उत्पत्तीचे केंद्र यामुळे डेंग्यूचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होऊ लागला आहे. डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी मनपा प्रशासनाकडे प्रभावी यंत्रणा नाही. यातच कमी मनुष्यबळ व यंत्रामुळे धूर फवारणी व कीटकनाशक फवारणीला मर्यादा आल्या आहेत. जुलै महिन्यांपासून सुरू झालेल्या घरांच्या विशेष सर्वेक्षण मोहिमेत त्याच त्याच घरात डेंग्यू अळी आढळूून येत असतानाही दंडात्मक कारवाई होत नसल्याने डेंग्यू कमी होण्याचे नाव घेत नाही. यातच मनपाच्या प्रयोगशाळेत डेंग्यू तपासणी किटचा तुटवडा पडल्याने आजार नियंत्रणाबाहेर तर जाणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
-‘एनएस १ अँटिजन’ चाचणी ठप्प
डेंग्यूचा ताप मलेरिया, झिका विषाणूचा संसर्ग, व्हायरल हिपॅटायटीस, चिकनगुनिया यासारखा असू शकतो. यामुळे वैद्यकीय तपासणीनंतर आवश्यक त्या चाचण्या गरजेच्या असतात. यासाठी ‘एनएस १ अँटिजन’ ही रक्त तपासणी अनिवार्य ठरते. परंतु मेयोच्या प्रयोगशाळेत या तपासणीची किट दोन आठवड्यांपासून उपलब्धच नसल्याने ही तपासणीच बंद आहे.
-‘आयजीएम अँटीबॉडीज’ तपासणीला मर्यादा
ताप तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिल्यास ‘आयजीएम अँटीबॉडीज’ तपासणीचा सल्ला दिला जातो. यात रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास डेंग्यूचे निदान होते. मात्र, मनपाच्या प्रयोगशाळेत रोज केवळ दोनच किट लावल्या जातात. एका किटमध्ये जवळपास ९२ नमुने तपासले जातात. त्या उलट मनपाकडे रोज ३००वर नमुने येत असल्याने प्रलंबित नमुन्यांची संख्या वाढत आहे.
-मनपा खरेदी करणार किट
शासनाकडून नियमित किट उपलब्ध होत नसल्याने आता महानगरपालिका किट खरेदी करणार असल्याचे मनपाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. ज्या रुग्णांना ताप येऊन तीन पेक्षा जास्त दिवस झाले त्यांचीच ‘आयजीएम अँटीबॉडीज’ करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले.