विदर्भात स्वाईन फ्लूचे ३५५ रुग्ण : मृत्यूचा आकडा गेला ३९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:02 AM2019-07-09T00:02:00+5:302019-07-09T00:05:02+5:30
जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३५५ रुग्ण आढळून आले असून मृत्यूचा आकडा ३९ वर पोहचला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. रुग्णांची संख्या २४५वर पोहचली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने लोकांनी सतर्क राहण्याचे व लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन, आरोग्य विभागाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जानेवारी ते आतापर्यंत विदर्भात स्वाईन फ्लूचे ३५५ रुग्ण आढळून आले असून मृत्यूचा आकडा ३९ वर पोहचला आहे. विशेष म्हणजे, रुग्णांची सर्वाधिक नोंद नागपूर जिल्ह्यात झाली आहे. रुग्णांची संख्या २४५वर पोहचली आहे. सध्या ढगाळ वातावरण असल्याने लोकांनी सतर्क राहण्याचे व लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन, आरोग्य विभागाने केले आहे.
पावसाला हवी तशी सुरुवात झाली नाही. बदलत्या वातावरणाचा परिणाम शरीरावर होऊ लागला आहे. सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हीच लक्षणे स्वाईन फ्लूची आहेत. परंतु अनेक रुग्ण सुरुवातीलाच गंभीरतेने घेत नाही. जेव्हा आजाराची गुंतागुंत वाढते तेव्हाच रुग्ण डॉक्टरांकडे जातो. परिणामी, स्वाईन फ्लूमुळे मृत्यूचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. उपलब्ध माहितीनुसार, १ जानेवारी ते ८ जुलै २०१९ पर्यंत नागपूर शहरात २२२, ग्रामीणमध्ये २३, वर्धा जिल्ह्यात पाच, गोंदिया जिल्ह्यात पाच, भंडारा जिल्ह्यात चार, गडचिरोली जिल्ह्यात तीन, चंद्रपूर जिल्ह्यात नऊ, अमरावती जिल्ह्यात २१, अकोला जिल्ह्यात चार, यवतमाळ जिल्ह्यात तीन, बुलडाणा जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे, इतर राज्यातून नागपुरात उपचार घेतलेल्या रुग्णांची संख्या ४२ आहे. यात मध्य प्रदेशातील ४०, पश्चिम बंगालमधील एक व दिल्ली येथील एक रुग्ण आहे. जुलै महिन्यात विदर्भात एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. परंतु वातावरणातील बदल हा स्वाईन फ्लूसाठी पोषक असल्याने रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नागपूर जिल्ह्यात २५ मृत्यू
गेल्या सहा महिन्यात नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूने २५ बळी घेतले आहे. यात नागपूर शहरातील २० तर ग्रामीण भागातील पाच रुग्ण आहेत. भंडारा जिल्ह्यात एक, चंद्रपूर जिल्ह्यात चार, अमरावती जिल्ह्यात सहा, यवतमाळ जिल्ह्यात एक, अकोला जिल्ह्यात एक मुंबई जिल्ह्यात एक असे एकूण ३९ मृत्यूची नोंद झाली आहे.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नका
फ्लू व स्वाईन फ्लूची लक्षणे सारखीच असतात. यामुळे कुठलाही ताप अंगावर काढू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्याशिवाय औषधे घेऊ नका. जुलै महिन्यात स्वाईन फ्लूची नोंद झालेली नाही. परंतु उपसंचालक आरोग्य कार्यालय आजाराकडे लक्ष ठेवून आहे.
डॉ. संजय जयस्वाल
उपसंचालक, आरोग्य विभाग नागपूर
स्वाईन फ्लूची आकडेवारी
(१ जानेवारी ते ८ जुलै २०१९)
जिल्हा रुग्ण मृत्यू
नागपूर २४५ २५
वर्धा ५ ००
गोंदिया ५ ००
भंडारा ४ ०१
गडचिरोली ३ ००
चंद्रपूर ९ ०४
अमरावती २९ ०६
अकोला ४ ०१
यवतमाळ ३ ०१
बुलढाणा १ ००