३५.६० लाखाचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:07 AM2020-12-23T04:07:36+5:302020-12-23T04:07:36+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : विना रॉयल्टी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भिवापूर पाेलिसांनी कंबर कसली आहे. दाेन दिवसात दाेन ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : विना रॉयल्टी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध भिवापूर पाेलिसांनी कंबर कसली आहे. दाेन दिवसात दाेन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत रेतीसाठ्यासह ३५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात चालक व मालक अशा चाैघांविरुद्ध गुन्हा नाेंदवून आराेपींना अटक केली आहे. भिवापूर पाेलिसांच्या या कारवाईमुळे रेतीमाफियांचे धाबे दणाणले आहे.
अटक करण्यात आलेल्या आराेपींंमध्ये प्रशांत शेषराव अवचट (२३, रा. दिघोरी, ता. लाखांदूर, जि. भंडारा), सोमेश्वर प्रोफेसर वावरे (२४, रा. इरवा ता. नागभीड जि. चंद्रपूर), नीतेश मनोहर मोटघरे (२५, रा. विरलीखंडा, जि. भंडारा) व विठ्ठल सहादेव राऊत (४०, रा. सुरगाव, ता. उमरेड) यांचा समावेश आहे. पहिली कारवाई साेमवारी (दि.२१) मध्यरात्रीच्या सुमारास राष्ट्रीय मार्गावरील पोलीस टी-पाॅईंट परिसरात करण्यात आली. रेतीची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश भोरटेकर यांच्या निर्देशानुसार पाेलिसांनी सापळा रचला. दरम्यान एमएच-३६/एएफ-३८२१ क्रमांकाच्या भरधाव टिप्परला थांबवून तपासणी केली असता, विना रॉयल्टी सहा ब्रास रेतीसाठा आढळून आला.
महामार्गावरील मानोरा शिवारात रविवारी (दि.२०) दुपारच्या सुमारास करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत एमएच-४०/बीजी-४९५८ क्रमांकाच्या टिप्परमधून विना रॉयल्टी सहा ब्रास रेती जप्त करण्यात आली. या दाेन्ही कारवाईमध्ये ६० हजार रुपये किमतीची १२ ब्रास रेती व ३५ लाख रूपये किंमतीचे दोन टिप्पर असा एकूण ३५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी आरोपी मालक व चालकाविरुध्द भादंविच्या कलम ३७९, १०९ सहकलम १८४, १७७, १७९ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नाेंदविला आहे. ही कारवाई ठाणेदार महेश भोरटेकर यांच्या नेतृत्वात वाहतूक पोलीस राकेश त्रिपाठी, अजय झाडे, दीपक जाधव, नरेंद्र पटले, चंद्रकांत रेवतकर, राजेंद्र डहाके, डोईफोडे यांच्या पथकाने केली.