नागपुरातील ३६ रुग्णांचा श्वास एका सिलेंडरच्या भरवशावर; आयुष इस्पितळ प्रकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 07:00 AM2021-04-24T07:00:00+5:302021-04-24T07:00:07+5:30
Nagpur News सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते.
राजीव सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सदरस्थित आयुष इस्पितळात गुरुवारी मोठा अपघात टळला. एकवेळ तर अशी आली होती जेव्हा प्राणवायूचा पुरवठा करणाऱ्या वाहिनीमधील चारपैकी केवळ एकच नोजल काम करीत होते. दर १५ मिनिटांनी सिलेंडरला बदलावे लागत होते. सुमारे तीन तास दुरुस्तीचे काम चालले. जर थोडासा जरी उशीर झाला असता तर अनेक रुग्णांचा जीव जाण्याची शक्यता होती.
इस्पितळात अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांचे दोन नातेवाईक दाखल नसते तर इतकी तत्परता कुणीच दाखविली नसती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरवठा वाहिनीला चार सिलेंडर जुळले होते. यातील एक नोजल बंद होते, दोन नोजल खराब झाले होते व पुरवठा वाहिनीच्या केवळ एकाच नोजलच्या भरवशावर ३६ रुग्णांना प्राणवायू जात होता. दुपारी ४.०५ वाजता जेव्हा लिकेजची समस्या लक्षात आली तेव्हा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी कसेतरी नोजल ठीक केले. मात्र हे पर्याप्त नव्हते. जर काम करणारे एक नोजल बंद झाले असते तर रुग्णांच्या जीवाला धोका होता.
मनपाच्या तीन रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या रुग्णांना भरती केले जात आहे. यात गांधीनगरस्थित इंदिरा गांधी रुग्णालय, इमामवाडास्थित आयसोलेशन इस्पितळ, सदरस्थित आयुष इस्पितळ यांचा समावेश आहे. तेथे केवळ ऑक्सिजन असलेले बेड आहेत. इंदिरा गांधीमध्ये ९२, आयसोलेशनमध्ये ३२ व आयुष इस्पितळात ४२ रुग्ण भरती आहेत.
मनपाकडे पाहणीची व्यवस्थाच नाही
कोरोनाची स्थिती पाहता मनपातर्फे तडकाफडकी तेथे ऑक्सिजन पुरवठ्याची वाहिनी टाकण्यात आली. कंत्राटाच्या आधारावर काम करविण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे याच्या पाहणीची जबाबदारी आहे. हा विभाग सिव्हिल इंजिनिअरिंगशी जुळला आहे. पुरवठा वाहिनीची डागडुजी, पाहणीसाठी इस्पितळात तंत्रज्ञ नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे. परंतु मनपाकडे याची काहीच व्यवस्था नाही. अशास्थितीत अपघात झाला तर त्याची थेट जबाबदारी मनपावर असेल. पाचपावली व केटीनगर इस्पितळात ऑक्सिजन वाहिनी टाकणे व रुग्णांना दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांची भरती
इस्पितळांमध्ये ऑक्सिनजची पुरवठा वाहिनी टाकण्यासोबतच क्षमतेपेक्षा अधिक रुग्णांना दाखल करण्यात येत आहे. इस्पितळांमध्ये विद्युत वाहिन्यांसोबतच इतर सुविधा जुन्या आहेत. अशास्थितीत भार वाढल्याने आग लागणे, लिकेज होणे अशा घटना होत आहेत, अशी माहिती मनपाचे मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.