तीन वर्षांत ३६ जणांचा जीव गेला, ४७ गंभीर जखमी तरीही....
By जितेंद्र ढवळे | Published: November 29, 2023 05:54 PM2023-11-29T17:54:12+5:302023-11-29T17:57:40+5:30
काटोल-सावरगाव मार्गाचे रुंदीकरण कधी?
नागपूर : अरुंद असलेला काटोल-सावरगाव मार्ग सध्या अपघात मार्ग झाला आहे. या मार्गावर दिवसाआड लहान-मोठे अपघात होत असतात. गत तीन वर्षात या मार्गावर झालेल्या विविध अपघातात ३६ जणांचा जीव गेला तर ४७ जण गंभीर जखमी झाले आहेत. तरीही या मार्गाचे रुंदीकरण कधी होणार, याबाबत लोकप्रतिनिधी वा अधिकारी यांनी मौन बाळगले आहे. काटोल-सावरगाव वडचिचोली मार्गे मध्य प्रदेशला जोडला जाणार राज्य मार्ग आहे. या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.
काटोल शहरातून जाणाऱ्या या मार्गावर जड वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. कोंढाळी राष्ट्रीय मार्गावरून मध्य प्रदेशला जाण्याकरिता हा मार्ग सोईचा ठरतो. या मार्गावरून मध्य प्रदेश, सावनेर आदी भागांतून रेतीचे टिप्पर रात्रन् दिवस धावतात. अशात या मार्गावर काटोल-सावरगाव-नरखेड यामध्ये येणाऱ्या अनेक गावांच्या दुचाकी-चारचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते.
गत तीन वर्षात या मार्गावर झालेल्या अपघातांपैकी ८० टक्के अपघातांचे कारण मार्गाची कमी रुंदी असल्याचे आढळून आले आहे. अनेकदा मोठी गाडी आली की दुसऱ्या बाजूने येणारी गाडी ही सरळ खाली जाते. त्यामुळे गाडी चालकाचा तोल जाऊन अपघात झाले आहेत. काहींना ओव्हरटेक करताना पुढे जागाच मिळाली नसल्याने अपघात झाले आहेत.
काटोल-सावरगाव मार्गावर येनवा, डोंगरगाव, मेंडकी, मसली सोनोली आणि अनेक गावांतील शेकडो नागरिक नियमित काटोल शहरात रोजगार व इतर कामांसाठी येतात. या मार्गावर गत पाच वर्षांत वर्दळ वाढली आहे. या मार्गाचे तातडीने रुंदीकरण होणे गरजेचे आहे.
- सागर भैस्वार, रा. मेंडकी
पूर्वी या मार्गावर मोजक्याच वाहनांची वर्दळ असायची. आज यात मोठी वाढ झाली आहे. काटोल-डोंगरगावपर्यंत तर आता लोकवस्ती वाढली आहे. मी डोंगरगाव येथील कंपनीत नोकरीला जातो. अशात नियमित अपघात झाल्याचे दिसून येतात. त्यामुळे कमीत कमी डोंगरगावपर्यंत तरी या मार्गाचे रुंदीकरण आवश्यक आहे.
- संदीप बरडे, खंते ले-आऊट, काटो