नागपुरात तासाभरात पकडले वाळू माफियाचे ३६ टिप्पर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 10:19 PM2018-06-29T22:19:09+5:302018-06-29T22:20:10+5:30
झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांनी गुरुवारी रात्री उमरेड रोडवर रेती आणि गिट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम चालवित तासाभरात ३६ टिप्पर पकडले. या करवाईमुळे वाळू आणि खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांनी गुरुवारी रात्री उमरेड रोडवर रेती आणि गिट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम चालवित तासाभरात ३६ टिप्पर पकडले. या करवाईमुळे वाळू आणि खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे.
डीसीपी भरणे यांनी हुडकेश्वरचे ठाणेदार सत्यवान माने यांच्या मदतीने रात्री ११ वाजता उमरेड रोडवरील आऊटर रिंंगरोडवर मोहीम राबवली. तासाभरातच गिट्टी व रेतीने भरलेल्या अनेक वाहनांना थांबवून पोलिसांनी त्यांच्या दस्तऐवजाची तपासणी केली. प्राथमिक तपासात पोलिसांना अनेक वाहनांच्या रॉयल्टी दस्तावेजात गडबड असल्याचे आढळून आले. भरणे यांनी तहसीलदार आणि नायब तहसीलदारांशी मोबाईवर संपर्क साधला. त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने वाहनांना ताब्यात घेतले. शुक्रवारी सकाळी स्थानिक प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांनी भरणे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना कारवाईची माहिती देण्यात आली. तेव्हा ग्रामीण परिसराचे नायब तहसीलदार बमनोटे यांना चौकशीसाठी पाठवण्यात आले.
उमरेड रोडने दरदिवशी रेती, गिट्टी आणि मुरुम घेऊन शेकडो वाहने ये-जा करतात. स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या मदतीने अवैध वाहतूक होत असते. या धंद्यात लाखो रुपयांचे वारे-न्यारे होतात. त्यामुळे हा धंदा अनेक वर्षांपासून सुरू आहे. आठ महिन्यांपूर्वी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी या अवैध धंद्याबाबत ठाणेदारांना सुनावले होते. तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान वाळू माफियांनी महसूल विभागाच्या अधिकाºयांवर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता.
मंडळ अधिकारी आर.एच. बमनोटे यांनी सांगितले की, पोलिसांनी ३६ वाहने पकडली आहे. यापैकी १६ वाहनांकडे जुनी रॉयल्टी होती. त्यांचे प्रकरण तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ते उद्या कारवाईचा निर्णय घेतील. ही कारवाई डीसीपी नीलेश भरणे, एसीपी रवींद्र कापगते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान माने, एपीआय कदम, पीएसआय सहरे, वडोदे, राठोड आदींनी केली.
नेत्यांचा आश्रय
वाळू माफियांना नेत्यांचा आश्रय मिळालेला आहे. त्यांच्याशी जुळलेले अनेक नेते राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईनंतरही वाळू माफियांना कुठलाही फरक पडत नाही.