‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2023 10:08 PM2023-06-16T22:08:38+5:302023-06-16T22:08:59+5:30
Nagpur News ‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ए.एस.ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
नागपूर : ‘व्हर्टिकल फार्मिंग’च्या नावाखाली गुंतवणूकदारांची ३.६७ कोटींनी फसवणूक करण्यात आली. या प्रकरणात ए.एस.ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी या कंपनीच्या पदाधिकाऱ्यांसह चार आरोपींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कंपनीने गुंतवणूकदारांच्या जागेवर पॉलीहाऊस बांधून देण्याचेदेखील आश्वासन दिले होते. नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
निकुंज शशीकांत दोशी (७०, फार्मलँड, रामदासपेठ) असे तक्रारकर्त्याचे नाव आहे. तर प्रशांत झाडे (सॅलेसबरी सोसायटी, अंबरनाथ, ठाणे), भाटु ठाकरे, संदेश खामकर( ठाणे) व हिरेन पटेल अशी आरोपींची नावे आहेत. निकुंज दोशी यांना संबंधित कंपनीबाबत माहिती मिळाली. यात पैसे गुंतविले असता चांगला परतावा मिळत असल्याचे त्यांना आमिष दाखविण्यात आले. आरोपींना त्यांना व्हर्टिकल फार्मिंगच्या विविध योजनांची माहिती दिली. पैसे गुंतविल्यानंतर कंपनी गुंतवणुकदारांच्या जागेवर पाॅलीहाऊस बांधून देईल. तसेच तांत्रिक मदत करणाऱ्या व्यक्तींचा खर्च व इतर साहाय्यदेखील करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
प्रत्येक वर्षाला १०० टक्के असा १२ वर्ष परतावा मिळेल असे आमिष दाखविण्यात आले. या प्रकल्पाचा खर्च १.०८ कोटी असून गुंतवणूकदारांना ४० लाखच गुंतवावे लागणार असल्याचा दावा आरोपींनी केला. निकुंज दोशी यांनी व त्यांचा मुलगा रिशी यांनी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. निकुंज दोशी यांनी ४० लाख गुंतविले. १५ महिन्यांच्या आत ३६ लाख रुपये मिळतील असे सांगण्यात आले. दोशी यांनी त्यांच्या शेतीतील १६ गुंठ्यामध्ये मे २०२२ मध्ये पॉलिहाऊस शेडदेखील तयार केले. कंपनीने त्यांना पाच लाख रुपये खर्चदेखील करायला लावला. मात्र कंपनीने त्यांना कुठलाही परतावा दिला नाही. निकुंज दोशी यांच्यासह आणखी चार गुंतवणूकदारांनी यात पैसे गुंतविले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दोशी यांनी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.