तीन लाखांवर तीन कोटींचा व्हर्चुअल नफा, प्रत्यक्षात निघाला गंड्याचा फंडा
By योगेश पांडे | Published: July 2, 2024 09:55 PM2024-07-02T21:55:30+5:302024-07-02T21:55:51+5:30
फेसबुक फ्रेंडकडून ३.७३ लाखांची फसवणूक
नागपूर : फेसबुक फ्रेंडने शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करण्याच्या नावाखाली नागपुरातील एका व्यक्तीला ३.२३ लाखांनी गंडा घातला. त्याने ब्लॉक ट्रेडिंग व आयपीओचे नाव घेत फिर्यादीला जाळ्यात ओढले. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
अतुल शेषराव शेंडे (४९, आदर्शनगर, उमरेड मार्ग) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते दोन वर्षांपासून एका शेअर ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून ट्रेडिंग करत होते. फेसबुकवर त्यांना अर्जुन कपूर नावाने अकाऊंट दिसले. अलायन्स ग्लोबल इन्व्हेस्टर नावाच्या कंपनीशी जुळल्याचा त्याने दावा केला व त्याने शेंडे यांना ट्रेडिंगच्या टीप्स देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यामुळे शेंडे यांना फायदा झाला. जास्त फायदा हवा असेल तर मी सांगतो त्या ॲपच्या माध्यमातून ब्लॉक ट्रेडिंग व आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला कपूरने दिला.
हे सर्व संभाषण फेसबुक व व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच होत होते. २० फेब्रुवारी ते ६ एप्रिल या कालावधीत शेंडे यांनी ग्लोबल इन्व्हेस्टरच्या ॲपमध्ये ३.२३ लाख रुपये गुंतविले. त्यांना या गुंतवणूकीवरील नफा तीन कोटी इतका दाखवत होता. शेंडे यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता ते निघत नव्हते. त्यांनी अर्जुन कपूरची सहकारी निता गुप्ता हिला ८२७४८८५०३१ या क्रमांकावर चॅटिंगच्या माध्यमातून विचारणा केली. मात्र तेथून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. काही दिवसांनी आरोपींनी संबंधित ॲपच बंद करून टाकले. आपल्यासोबत फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेंडे यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.