नागपुरात चार विमानांमधून आलेत ३७५ प्रवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 11:50 PM2020-05-25T23:50:38+5:302020-05-25T23:53:49+5:30
दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या घरगुती विमानसेवेंतर्गत देशाच्या विविध भागातून सोमवारी नागपूर विमानतळावर आलेल्या जवळपास ३७५ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून हातावर २५ तारखेचे क्वारंटाईचे शिक्के लावण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या घरगुती विमानसेवेंतर्गत देशाच्या विविध भागातून सोमवारी नागपूर विमानतळावर आलेल्या जवळपास ३७५ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून हातावर २५ तारखेचे क्वारंटाईचे शिक्के लावण्यात आले. त्यामुळे नागपुरात आलेल्या प्रवाशांना १४ दिवस घरातच राहावे लागेल. नागपुरातून चार उड्डाणांद्वारे २२१ प्रवासी संबंधित ठिकाणी परतले. विमानात कुठलीही सीट रिक्त ठेवण्यात आली नव्हती, हे विशेष.
एअर इंडियाचे दिल्लीहून एक विमान सकाळी ८.१० वाजता आणि इंडिगोची तीन विमाने बेंगळुरूहून सकाळी ९.५० वाजता, मुंबईहून १०.४० आणि दिल्लीहून सकाळी ११.४५ वाजता नागपुरात आली. २५ आणि २६ मे रोजी राज्यातून उड्डाणे होणार नाहीत, असे पश्चिम बंगाल सरकारने आधीच स्पष्ट केल्याने कोलकात्याहून सायंकाळी ७.२५ वाजता येणारे इंडिगोचे विमान रद्द झाले. एअर इंडियाच्या विमानाने जवळपास ५५ प्रवासी आणि इंडिगोच्या तीन विमानाने ३२० प्रवासी आल्याची माहिती आहे. प्रवासी विमानतळावर उतरताच सर्वांची प्रशासनाने तैनात केलेल्या डॉक्टरांनी थर्मल स्कॅनिंग केली. प्रवाशांच्या सर्व सामानावर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. यानंतर नियमाप्रमाणे सर्वांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के लावले. काही प्रवाशांनी शिक्के मारण्यास मनाई केल्याने काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पण नियमानुसार शिक्के लावणे बंधनकारक असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनी होकार दिला. विमानाच्या उड्डाणापूर्वी संबंधित ठिकाणी प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले. याशिवाय नागपुरातून उड्डाण करणाºया विमानातील प्रवाशांना प्रशाासनाने नागपुरात प्रतिज्ञापत्र भरून घेतले.
एअर इंडियाच्या नागपूर विमानतळ व्यवस्थापिका प्रीती सावंत म्हणाल्या, एअर इंडियाच्या नियमानुसार सोमवारी विमान आले, पण मंगळवारी येणार नाही. त्यामुळे मंगळवारी अन्य कंपन्यांची विमाने नागपुरात येणार आहेत. कंपनीने प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा केल्या आहेत. इंडिगो कंपनीने मास्क आणि चेहरा कव्हर करणारे प्लास्टिकचे आवरण प्रत्येक प्रवाशाला उपलब्ध करून दिले. शिवाय सॅनिटायझरची व्यवस्था केली होती. क्रू मेंबरने पीपीई किट परिधान केली होती.
क्वारंटाईन प्रवाशांकडून कोरोनाचा धोका कायम
नागपुरात येणाऱ्या सर्व प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांचे मोबाईल क्रमांक आणि पत्ता प्रशासन व कंपन्यांकडे उपलब्ध आहेत. हे प्रवासी खरेच घरी आहेत का किंवा बाहेर फिरत तर नाही ना, याची शहानिशा करण्यात येणार आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येणार आहे. प्रवाशांची शहानिशा होणार किंवा नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. जर एखादा प्रवासी बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर कोणती कारवाई करणार, हे अद्याप स्पष्ट नाही. नागपुरात आलेल्या ३७५ प्रवाशांमध्ये काही प्रवासी पॉझिटिव्ह असल्यास त्यांच्या संसर्गाचा धोका इतर प्रवासी आणि नागरिकांना होण्याची भीती निर्माण झाली आहे. कदाचित या कारणाने राज्य शासनाने घरगुती विमान सेवेला प्रारंभी परवानगी नाकारली होती.
प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के
प्रशासनाच्या नियमानुसार विमानातून नागपुरात आलेल्या सर्व प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के लावण्यात आले आहेत. या सर्व प्रवाशांना १४ दिवस घरातच राहावे लागेल. या सर्वाचे मोबाईल क्रमांक आणि घरांच्या पत्त्यांची प्रशासनाकडे नोंद आहे. चार विमानाने नागपुरात ३७५ प्रवासी आले तर याच विमानांनी २२१ प्रवासी देशाच्या विविध भागात गेले. मंगळवारी केवळ इंडिगोची विमाने येणार आहेत.
- मो. आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.