पार्किंगमुळे ‘रेल्वे’च्या तिजोरीत महिन्याला ३७.६९ लाखांची भर; रेल्वे स्थानक प्रशासनाची माहिती
By नरेश डोंगरे | Published: May 6, 2024 12:30 AM2024-05-06T00:30:30+5:302024-05-06T00:30:50+5:30
वाहन पार्किंगची नीट सोय झाल्याने प्रवासीही समाधानी
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: रेल्वे स्थानक परिसरात प्रशासनाने पार्किंगच्या समस्येवर तोडगा काढताच प्रवाशांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या तिजोरीतही घसघशीत भर पडली आहे.
गेल्या दोन ते तीन वर्षांत मुख्य रेल्वे स्थानक परिसरात पार्किंगची समस्या खूपच जटिल झाली होती. स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांना एकीकडे वाहन लावायला जागा उपलब्ध नव्हती तर दुसरीकडे बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना टॅक्सी किंवा ऑटो वगळता दुसरे वाहन पाहिजे असेल तर बरेच दूर पायी जाऊन साधन मिळवावे लागत होते. रेल्वे स्थानकाजवळून बनविण्यात आलेल्या उड्डाणपुलाने ही समस्या आणखीच जटिल बनविली होती. त्यात गणेश टेकडी पूलही हटविण्यात आल्याने प्रवाशांच्या नाकी नऊ आले होते. पुरेशी जागा नसल्याने रेल्वे स्थानकासमोरच्या मार्गावर वाहतुकीचा वारंवार खोळंबा होत होता. तर, वाहने लावण्यासाठी जागाच नसल्याने रेल्वे प्रशासनाच्या नावाने प्रचंड ओरड होत होती. या पार्श्वभूमीवर येथील शीर्षस्थ अधिकाऱ्यांनी उपलब्ध जागेतच योग्य ते नियोजन करून पार्किंगची व्यवस्था केल्याने एकीकडे प्रवाशांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे. वारंवार होणारी ट्रॅफिक जामची समस्या निकाली निघाली आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, पार्किंगच्या व्यवस्थेतून रेल्वेच्या तिजोरीत घसघशीत भर पडू लागली आहे. रेल्वे स्थानकावर देण्यात आलेल्या पार्किंगच्या कंत्राटातून एकट्या एप्रिल महिन्यात ३७ लाख, ६९ हजार रुपयांची प्रशासनाला कमाई झाली आहे.
---------
महिनाभरात दुचाकीतून १०.०६ लाख
घरोघरी, जागोजागी दुचाक्या दिसत असल्याने उपराजधानीला दुचाक्यांचे शहर म्हणूनही ओळखले जाते. पाहिजे त्या ठिकाणी लवकर पोहोचता यावे म्हणून अनेक जण दुचाकीवरच प्रवासाला प्राधान्य देतात. रेल्वे स्थानकावर रोज हजारो दुचाक्या बघायला मिळतात. त्यामुळे दुचाकी पार्किंगच्या कंत्राटातून मिळालेल्या १०.०६ लाखांच्या मोबदल्याचाही समावेश आहे.