विकास कामांवर ३७७ कोटी खर्च
By admin | Published: June 19, 2015 02:37 AM2015-06-19T02:37:38+5:302015-06-19T02:37:38+5:30
सन २००१ ते २०१५ या कालावधीत नासुप्रकडे ४५९.६८ कोटी रुपये निधी जमा झाला असून या निधीतून आतापर्यंत रस्ते, ....
नागपूर : सन २००१ ते २०१५ या कालावधीत नासुप्रकडे ४५९.६८ कोटी रुपये निधी जमा झाला असून या निधीतून आतापर्यंत रस्ते, स्टॉर्म वॉटर ड्रेन, मलवाहिका आदी कामांसाठी ३०३.६६ कोटी रुपये आणि पिण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी ७३.९८ कोटी रुपये असे एकूण ३७७ कोटी रुपये खर्च केले असल्याचा दावा, नागपूर सुधार प्रन्यासने केला आहे.. कायद्यातील तरतुदीनुसार ६८.९५ कोटी रुपयाचा निधी प्रशासकीय खर्चासाठी वापरण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूर सुधार प्रन्यासचे लेखा व वित्त अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियमान्वये नागपूर सुधार प्रन्यासला ५७२/१९०० अनधिकृत अभिन्यासाचा विकास करण्याची जबाबदारी राज्य शासनाने दिलेली आहे. त्यासाठी संबंधित अभिन्यासातील भूखंडधारकांकडून विकास शुल्क वसुल करण्याची तरतूद आहे. सन २००१ ते २०१५ पर्यंत उपरोक्त नमूद अभिन्यासातून ४५९.६८ कोटी रुपयाचा निधी जमा झाला. त्या निधीतून बहुतांश सुविधांची कामे करण्यात आली.
त्यावर ३०३.६६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. या अभिन्यासामध्ये पिण्याची पाण्याची पाईप लाईन टाकण्यासाठी नासुप्रने ७३.९८ कोटी खर्च केले. त्यामुळे आजपर्यंत नासुप्रने ३७७ कोटी विकास कामावर खर्च केलेला आहे.
तसेच गुंठेवारी अभिन्यासातील परिच्छेद क्रमांक ६(१) नुसार नासुप्रला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी १५ टक्के रक्कम नियोजन प्राधिकरण प्रशासनिक खर्चासाठी ठेवून घेईल, अशा प्रकारची तरतूद आहे. या तरतुदीनुसारच ६८.९५ कोटाचा निधी प्रसासकीय खर्चासाठी वापरण्यात आला.
त्यामुळे ३७७ कोटी आणि प्रशासकीय खर्च ६८.९८ कोटी असे एकूण ४४६.६० कोटी रुपये विकास कामावर खर्च झालेला आहे.
उर्वरित १३.०८ कोटीचा निधी जो शिल्लक आहे. त्या निधीतून आजही उपरोक्त ले-आऊटमध्ये बहुतांश सुविधा पुरवण्याचे काम सुरू आहे. आजच्या तारखेला विविध ले-आऊटमध्ये ४० कोटीपेक्षा जास्त रकमेचे काम सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)