नागपूर रेल्वेस्थानकावर दारूच्या ३७८ बॉटल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2018 12:56 AM2018-03-02T00:56:40+5:302018-03-02T00:57:00+5:30
रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या तीन कारवायात दारूच्या १०९५० रुपये किमतीच्या ३७८ बॉटल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. होळीसाठी दारुबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात ही दारूची तस्करी होत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या तीन कारवायात दारूच्या १०९५० रुपये किमतीच्या ३७८ बॉटल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. होळीसाठी दारुबंदी असलेल्या वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात ही दारूची तस्करी होत होती.
रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे शाखेचे सहायक उपनिरीक्षक संजय पुरकाम यांना बुधवारी रात्री ११.५० वाजता दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती निरीक्षक भगवान इप्पर यांना दिली. त्यांनी सहायक उपनिरीक्षक संजय पुरकाम, किशोर चौधरी, नीळकंठ गोरे यांची चमू गठित केली. या चमूला प्लॅटफार्म क्रमांक २ वर रेल्वेगाडी क्रमांक १२५७७ बागमती एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ९० मिलिलिटरच्या ९३ बॉटल आढळल्या. याची किंमत २४०० रुपये आहे. दुसºया घटनेत रेल्वे सुरक्षा दलाच्या उषा तिग्गा, सुषमा ढोमणे यांना दारूची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांना दिली. त्यांनी उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, दिलीप कुमार, उषा तिग्गा, सुषमा ढोमणे, केदार सिंह, रजनलाल गुर्जर, बिक्रम यादव यांची चमू गठित केली. चमूला प्लॅटफार्म क्रमांक २ वर इटारसी एण्डकडील भागात एक बेवारस बॅग आढळली. बॅगची तपासणी केली असता त्यात ३३५० रुपये किमतीच्या दारूच्या ८५ बॉटल आढळल्या. तिसºया घटनेत गुरुवारी सायंकाळी ६ वाजता आरपीएफचा प्रधान आरक्षक केदार सिंह, रजनलाल गुर्जर यांना दारूची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक कृष्णा नंद राय, दिलीप कुमार, बिक्रम यादव यांच्यासह प्लॅटफार्म क्रमांक २ वर तपासणी केली. यावेळी वैभव सुरेश जवादे (१९), संग्राम घनशाम त्रिवेदी (१८) रा. शास्त्री वॉर्ड, पारी पोलच्या मागे, हिंगणघाट हेह संशयास्पद स्थितीत आढळले. त्यांच्या जवळील बॅगची तपासणी केली असता त्यात ५२०० रुपये किमतीच्या दारूच्या २०० बॉटल आढळल्या. तिन्ही घटनेत जप्त करण्यात आलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली.