नागपूर विमानतळावर २०० ग्रॅम सोन्यासह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोन्ही तस्कारांना अटक
By मोरेश्वर मानापुरे | Published: June 10, 2024 09:07 PM2024-06-10T21:07:25+5:302024-06-10T21:07:43+5:30
नागपूर सीमाशुल्क विभागाची कारवाई, मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव अशी तस्करांची नावे असून दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत
नागपूर : नागपूर सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) आणि एअर कस्टम्स युनिटच्या (एसीयू) अधिकाऱ्यांनी दोन प्रवाशांवर केलेल्या एकत्रित कारवाईत २०० ग्रॅम सोन्यासह एकूण ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ९ जूनला करण्यात आली. दोन्ही तस्कर एअर अरेबिया जी९-४१५ या क्रमांकाच्या विमानाने शारजाह येथून नागपुरात आले होते.
मोहम्मद तारिक शेख आणि सनी भोला यादव अशी तस्करांची नावे असून दोघेही मुंबईचे रहिवासी आहेत. कारवाईत या दोघांच्या ताब्यातून बाजारमूल्यानुसार १४.२० लाख रुपये किमतीचे २०० ग्रॅम सोने, १८,६१,९३० रुपये किमतीचे २० आयफोन १५ प्रो-मॅक्स, २,५९,९९२ रुपये किमतीचे ८ डेल लॅपटॉप, ४२ हजार रुपये किमतीचा एक आयपॅड, १४,४०० रुपये किमतीच्या विदेशी सिगारेट, असा एकूण ३७,८१,९४४ रुपयांचा माल अधिकाऱ्यांनी जप्त केला.
नागपूर सीमाशुल्क विभागाच्या एअर इंटेलिजेंस युनिट (एआययू) आणि एअर कस्टम्स युनिट (एसीयू) नागपूर सीमाशुल्क विभागाचे आयुक्त संजयकुमार आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. ही कारवाई एआययूचे सहायक आयुक्त अंजुम तडवी आणि एसीयूचे सहायक आयुक्त व्ही लक्ष्मीनारायण व अलेक्झांडर लाक्रा यांच्या नेतृत्वात सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक मनीष पंढरपूरकर, राजेश खापरे, प्रकाश कापसे आणि सीमाशुल्क निरीक्षक विशाल भोपटे, शुभम कोरी, योगिता मुलाणी, आदित्य बैरवा, कृष्णकांत ढाकर आणि प्रियांका मीना यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.