बापरे... एकाच शाळेतील तब्बल ३८ विद्यार्थी ‘कोरोना पॉझिटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2022 10:17 AM2022-07-18T10:17:37+5:302022-07-18T10:21:55+5:30
पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही शहरातील, तर काही ग्रामीण भागातील आहेत.
नागपूर : लहान मुलांमध्ये ‘व्हायरल’ वाढला असताना जयताळा येथील एका शाळेतील ३८ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने काळजी वाढली आहे. यातच चार महिन्यांतील दैनंदिन रुग्णसंख्येने रविवारी उच्चांकही गाठला आहे. २६२ रुग्णांची नोंद झाली आहे. यात शहरातील १६२, तर ग्रामीण भागातील १०० रुग्ण आहेत. रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८१ हजार २५० झाली आहे. सुदैवाने मागील १५ दिवसांपासून मृत्यूची संख्या १० हजार ३३९ वर स्थिर आहे.
प्राप्त माहितीनुसार, जयताळा येथील रॉय स्कूल येथील १००वर विद्यार्थ्यांमध्ये ताप, सर्दी व घसा खवखवण्याची लक्षणे आढळून आली. या सर्वांची कोरोनाच चाचणी केली असता यातील ३८ विद्यार्थी पॉझिटिव्ह आले. यामुळे सोमवारी त्यांच्या संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांचीही चाचणी केली जाणार आहे. याला महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दुजोरा दिला आहे. रविवार शाळा बंद असल्याने मुख्याध्यापकांशी संपर्क होऊ शकला नाही. पॉझिटिव्ह आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये काही शहरातील, तर काही ग्रामीण भागातील आहेत.
-पॉझिटिव्हिटी दर १३ टक्के
नागपूर जिल्ह्यात मागील २४ तासांत १ हजार ९६४ चाचण्या झाल्या. त्या तुलनेत पॉझिटिव्हिटीचा दर १३.३४ टक्क्यांवर गेला आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा दुसऱ्या लाटेनंतर ज्या जिल्ह्यात १० टक्क्यांवर पॉझिटिव्हिटीचा दर होता, तेथील निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. समाधानाची बाब म्हणजे, आज शहरातील ८६, ग्रामीण भागातील ३२ असे ११८ रुग्ण बरे झालेत.
-१० दिवसांतच दुप्पट रुग्ण
जून महिन्यापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. प्रथम १०० रुग्णांचा टप्पा ओलांडण्यास ३६ दिवसांचा कालावधी लागला; परंतु आता १० दिवसांतच रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. यात लहान मुलांची संख्या वाढताना दिसून आल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
भरती होणाऱ्यांची संख्या २ टक्के
दिवसेंदिवस रुग्ण वाढत असले तरी रुग्णालयात भरती होणाऱ्यांची संख्या २ टक्केच आहे. सध्या कोरोनाचे १ हजार २२१ रुग्ण सक्रिय आहेत. यात शहरातील ८१८, ग्रामीण भागातील ४०३ रुग्ण आहेत. १ हजार १९३ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत, तर २८ रुग्ण शासकीयसह विविध खासगी रुग्णालयांत भरती आहेत.
- सात दिवसांतील रुग्णांची स्थिती
११ जुलै : ६७ रुग्ण
१२ जुलै : १४६ रुग्ण
१३ जुलै : १९४ रुग्ण
१४ जुलै : १४० रुग्ण
१५ जुलै : १८८ रुग्ण
१६ जुलै : १७६ रुग्ण
१७ जुलै : २६१ रुग्ण.