नागपूर विभागातील ३८ हजार विद्यार्थी शिष्यवृतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 10:04 PM2018-09-21T22:04:44+5:302018-09-21T22:05:43+5:30
तांत्रिक चुकीमुळे विभागातील ३८ हजार विद्यार्थी शिष्यवृत्ती आणि फ्रीशिपपासून वंचित असल्याची कबुली समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तांत्रिक चुकीमुळे विभागातील ३८ हजार विद्यार्थीशिष्यवृत्ती आणि फ्रीशिपपासून वंचित असल्याची कबुली समाजकल्याण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.
प्रलंबित शिष्यवृत्तीबाबत शुक्रवारी दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक घेतली. यावेळी समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, अतिरिक्त संचालक माधव वैद्य, विभागीय उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड यांच्यासह सर्व सहायक आयुक्तांसह सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, संस्थाचालक उपस्थित होते. २०११-१२ ते वर्ष २०१६-१७ पर्यंत महाविद्यालय स्तरावर ३३ हजार ६८ तर सहायक आयुक्त स्तरावर ५९१० विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत. शिष्यवृत्ती योजना आॅनलाईन करण्यात आली आहे. मात्र, या प्रणालीत असलेल्या तांत्रिक त्रुटीमुळे विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहे. या त्रुटी दूर करण्यासाठी विभागाकडून प्रयत्न होत असल्याचे वाघमारे यांनी सांगितले. आॅनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज कशा प्रकारे निकाली काढावे, याबाबत गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
त्रुटींच्या पूर्ततेसाठी अर्ज विभागाकडून महाविद्यालयांना परत पाठविण्यात आले आहेत. हे अर्ज विभागाच्या ‘आयडी’वर ‘फॉरवर्ड’ होत नसल्याने अर्ज पाच वर्षांपासून प्रलंबित आहेत. एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहता कामा नये म्हणून सर्व अर्ज ‘मॅन्युअली’ निकाली काढण्याचा विचार शासन करीत आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी ६ आॅक्टोबरपर्यंत प्रलंबित अर्ज सादर करावे, असे आवाहन सचिव दिनेश वाघमारे यांनी केले आहे.