३८० महाविद्यालयांवर प्रवेश बंदीचे संकट? नॅकचे मानांकन नसल्याचा फटका बसणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2023 07:00 AM2023-03-07T07:00:00+5:302023-03-07T07:00:10+5:30
Nagpur News राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या चार जिल्ह्यांतील ३८० महाविद्यालयांवर प्रवेशबंदीचे संकट घाेंगावते आहे.
निशांत वानखेडे
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या चार जिल्ह्यांतील ३८० महाविद्यालयांवर प्रवेशबंदीचे संकट घाेंगावते आहे. राष्ट्रीय मूल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषद (नॅक) चे मानांकन नसलेल्या महाविद्यालयांवर प्रवेशबंदी लादण्याचा इशारा उच्च शिक्षण संचालनालयाने दिला आहे. विद्यापीठ संलग्नित ५०७ पैकी केवळ १२७ महाविद्यालयांना नॅकची मान्यता प्राप्त आहे.
नागपूर विद्यापीठाशी संलग्नित अनेक महाविद्यालये सध्या विद्यार्थी अभावाच्या संकटाचा सामना करीत आहेत. सुविधांचा अभाव असलेल्या महाविद्यालयांना विद्यार्थी सापडत नसून दरवर्षी पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या २५ हजारांवर जागा रिक्त राहत आहेत. असे असताना सरकारकडून नव्या महाविद्यालयांची खैरात वाटली जात आहे. केवळ नावासाठी असलेल्या महाविद्यालयांत व्यवस्था आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचाही अभाव असताे. यासाठीच नॅक मूल्यांकन बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वारंवार सूचना देऊनही बहुतेक महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन प्राप्त करून घेतले नाही. त्यामुळे संतापलेल्या उच्च शिक्षण संचालनालयाने सज्जड कारवाईचा इशारा दिला आहे. ज्या शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले नाही त्यांनी ते ३१ मार्चपूर्वी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्यांनी आधी केले असेल; पण त्यांच्या स्टेटस इनॲक्टिव्ह असेल, त्यांना ते ॲक्टिव्ह करण्याचे निर्देश संचालनालयाने दिले आहेत.
नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ५०७ महाविद्यालये आहेत. यात १४३ महाविद्यालये अनुदानित आहेत. १० शासकीय, तर ३५४ कायम विनाअनुदानित आहेत. यात महिला महाविद्यालयांची संख्या ५२ आहे. कला, वाणिज्य व विज्ञान अभ्यासक्रम असलेल्या मिश्र महाविद्यालयांची संख्या ३०६ आहे. ३५ ते ४० अभियांत्रिकी महाविद्यालये, अध्यापन व शारीरिक शिक्षणाचे ८५, फार्मसी काॅलेज १५, लाॅ काॅलेज १०, तर १३ एमबीएचे महाविद्यालये आहेत. यातील ७५ टक्के महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केलेच नाही. त्यामुळे ३१ मार्चपूर्वी मूल्यांकन केले नाही तर प्रवेशबंदीची टांगती तलवार त्यांच्यावर असेल, हे निश्चित.
६३ अनुदानित महाविद्यालये नॅकअभावी
विद्यापीठाअंतर्गत १४३ अनुदानित महाविद्यालयांपैकी ८० महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन झाले आहे. मात्र, ६३ महाविद्यालयांनी अद्याप ते केले नाही. यात नागपूरचे ४१, वर्ध्याचे १२, भंडाऱ्याचे ७ व गाेंदियाच्या ३ महाविद्यालयांचा समावेश आहे.