उन्हाळ्यात ३८० समर स्पेशल ट्रेन; गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ जास्त गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 09:27 PM2023-05-20T21:27:02+5:302023-05-20T21:27:48+5:30
Nagpur News विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरातील विविध प्रांतात एकूण ३८० समर स्पेशल (उन्हाळी विशेष रेल्वे) गाड्या चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
नागपूर : विविध रेल्वेगाड्यात प्रवाशांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने देशभरातील विविध प्रांतात एकूण ३८० समर स्पेशल (उन्हाळी विशेष रेल्वे) गाड्या चालविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या ३८० रेल्वेगाड्या जून अखेरपर्यंत देशातील विविध रेल्वे मार्गावर एकूण ६,३६९ फेऱ्या लावणार (धावणार) आहे.
गेल्या वर्षी उन्हाळ्यात ३४८ रेल्वेगाड्या चालविण्यात आल्या होत्या आणि या गाड्यांनी ४,५९९ फेऱ्या लावल्या होत्या. यावर्षी ३२ रेल्वेगाड्या १७७० फेऱ्या जास्त लावणार आहेत.
उन्हाळा संपायला अजून जवळपास २० ते २५ दिवस शिल्लक आहेत. सध्याच्या स्थितीत रेल्वेच्या प्रत्येक गाडीत प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. त्यात विविध मार्गावर रेल्वेस्थानक तसेच रेल्वेलाईनसह विविध विकास कामं सुरू असल्याने ठिकठिकाणच्या मार्गावर अनेक गाड्या तासं-न-तास उशिरा धावत आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी कुचंबना होत आहे. प्रवाशांचा रोष लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने गेल्या वर्षीच्या तुलनेत ३२ रेल्वेगाड्या जास्त चालविण्याचे जाहिर केले आहे. या विशेष रेल्वे गाड्यांमुळे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाना, ओडीशा, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली सोबत कनेक्टिव्हिटी वाढेल तसेच या राज्यातील प्रवाशांना त्याचा अधिक फायदा होणार असल्याचा दावा केला आहे.
नागपुरातून चार गाड्या
विशेष म्हणजे, नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर या दोन गाड्या, तर अजनी (नागपूर) ते पूणे आणि पुणे ते नागपूर या दोन अशा एकूण चार रेल्वेगाड्या समर स्पेशल म्हणून मार्च २०२३ पासून मे २०२३ पर्यंतच्या दोन महिन्याच्या कालावधीत रेल्वे प्रशासनाने सुरू केल्या आहेत. मुंबईला जाणारी गाडी ३ जूनपर्यंत तर, पुण्याच्या प्रवासाला असलेली गाडी १५ जूनपर्यंत धावणार आहे.