कोरोना नियंत्रणावर नागपूर मनपाचा ३८.१७ कोटींचा खर्च; बुधवारी होणार वादळी चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 10:44 AM2021-06-28T10:44:54+5:302021-06-28T10:48:53+5:30
Nagpur News कोरोना संकटामुळे महापालिकेचा आरोग्यावरील खर्च वाढला आहे. कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनावर ३८ कोटी १७ लाख ७ हजार ५३६ रुपये खर्च करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संकटामुळे महापालिकेचा आरोग्यावरील खर्च वाढला आहे. कोरोना नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनावर ३८ कोटी १७ लाख ७ हजार ५३६ रुपये खर्च करण्यात आले. आरोग्य सुविधा, वैद्यकीय उपकरणे, यंत्रसामुग्री, औषधे, इंजेक्शन, टेस्टींग, लसीकरण, कोविड केअर सेंटर, क्वारंटाईन सेंटर आदी बाबींवर हा खर्च करण्यात आला.
एसडीआयएफ अंतर्गत मनपाला २०२०- २१ या वर्षात ९ कोटी ७८ लाख तर २०२१- २२ या वर्षात १२ कोटी ५ लाख ३२ हजार ८०३ रुपयांचा निधी प्राप्त झाला. एनयूएचएम आरोग्य विभागांतर्गत १३ कोटी ६३ लाख ८३ हजार १०२ रुपये इतका निधी प्राप्त झाला होता. तसेच मनपाने दोन वर्षात २ कोटी ६९ लाख ९१ हजार ६३० कोटींचा खर्च आपल्या तिजोरीतून केला आहे. कोरोना संकटामुळे मनपावर आर्थिक भार वाढला तर दुसरीकडे उत्पन्नावर परिणाम झाला. परिणामी शहरातील विकास कामांना याचा फटका बसला. गेल्या दीड वर्षात शहरातील विकास कामे जवळपास ठप्प आहेत.
शहरात मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर एप्रिलमध्ये संसर्ग अधिक पसरला. मनपा प्रशासनाने इतर खर्च वगळून आरोग्य सुविधांवर लक्ष केंद्रित केले होते. कोरोनाची दुसरी लाट ही यावर्षी मार्च पासून सुरू झाली. एप्रिल महिन्यात शहरात प्रचंड वेगाने संसर्ग पसरला. महिनाभरात शहरात पहिल्या लाटेत निर्माण केलेल्या आरोग्य सुविधाही कमी पडल्या. त्यामुळे प्रशासनाला आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण कराव्या लागल्या. तसेच या लाटेत ऑक्सिजनची मोठी गरज भासली. त्यात कोरोना लसीकरण जानेवारीपासून सुरू झाल्याने यासाठी खर्च वाढत गेला. बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत यावर वादळी चर्चा होणार आहे.