३८,६६७ विद्यार्थी देणार आज आरोग्य विभागाची परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:08 AM2021-09-25T04:08:18+5:302021-09-25T04:08:18+5:30
नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गासाठी शनिवारी होणाऱ्या परीक्षेत नागपूर विभागातून ३८ हजार ६६७ तर ‘गट ड’ ...
नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘गट क’ संवर्गासाठी शनिवारी होणाऱ्या परीक्षेत नागपूर विभागातून ३८ हजार ६६७ तर ‘गट ड’ संवर्गासाठी रविवारी होणाऱ्या परीक्षेत ६४ हजार ७४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, यासंदर्भात कोणतीही तक्रार नागपूर आरोग्य विभागाला प्राप्त झाली नसल्याची माहिती आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांनी दिली.
आरोग्य विभागाच्या वतीने ‘गट क’ संवर्गातील २ हजार ७३९ आणि ‘गट ड संवगार्तील ३ हजार ४६६’ अशा एकूण ६ हजार २०५ पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. याच्या पहिला टप्प्यात शनिवार २५ सप्टेंबर रोजी ‘गट क’ संवर्गातील पदांसाठी नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या पाच जिल्ह्यात दोन सत्रात लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून ३८ हजार ६६७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. नागपूर जिल्ह्यात पहिल्या सत्रात ८२ केंद्रांवर तर दुसऱ्या सत्रात ३० केंद्रांवर परीक्षा होणार आहे.
- ‘गट ड’ संवर्गातील पदांसाठी नागपूर जिल्ह्यातून २९,६७६ विद्यार्थी
रविवार २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या ‘गट ड’ संवर्गातील पदांसाठी ६४ हजार ७४९ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यात नागपूर जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे २९,६७६ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. याशिवाय वर्धा जिल्ह्यातून ६ हजार ९६०, चंद्रपूर जिल्ह्यातून ९ हजार ५००, गोंदिया जिल्ह्यातून ६ हजार ७९० तर भंडारा जिल्ह्यातून ११ हजार ८३३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
- कुठलीही तक्रार नाही
सार्वजनिक आरोग्य विभागातील विविध पदांसाठी शनिवार आणि रविवारी परीक्षा होणार आहेत. यासाठीचे हॉलतिकीट विद्यार्थ्यांना मिळाले आहे. यात नावातील चुकांसह इतरही चुकांशी संबंधित कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. परंतु ज्यांच्या तक्रारी असतील त्यांनी उपसंचालक आरोग्य विभाग, नागपूर कार्यालयाशी संपर्क साधावा.
- डॉ. संजय जयस्वाल, उपसंचालक आरोग्य विभाग