४.७३ लाखाचे ३८ मोबाईल पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:07 AM2017-10-09T01:07:28+5:302017-10-09T01:07:39+5:30
प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाºया टोळीचा रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केला आहे. रविवारी आरपीएफने केलेल्या कारवाईत चोरीचे ४.७३ लाखाचे ३८ मोबाईलसह एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली ....
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रवाशांचे महागडे मोबाईल चोरणाºया टोळीचा रेल्वे सुरक्षा दलाने पर्दाफाश केला आहे. रविवारी आरपीएफने केलेल्या कारवाईत चोरीचे ४.७३ लाखाचे ३८ मोबाईलसह एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली असून दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी गठित केलेल्या चमूतील उपनिरीक्षक होती लाल मिना, आरपीएफचा जवान विकास शर्मा, बिक्रम यादव, विवेक कनोजिया, उमेश सिंह हे रविवारी १२ वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वर गस्त घालत होते. यावेळी त्यांना इटारसी एण्डकडील भागात एक संशयित व्यक्ती फिरताना आढळला. चौकशीत त्याने आपले नाव सिनम कार्तिक श्रीनिवास (१९) रा. कोत्तरपूर, करीमनगर, तेलंगणा सांगितले. तो बी. ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी असून करीमनगरमध्ये नर्सिंगचे काम करतो. रेल्वेस्थानकावर येण्याचे कारण विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्याच्याजवळील बॅगची तपासणी केली असता त्यात सॅमसंग, ओप्पो, एमआय, पॅनासॉनिक, व्हिओ कंपनीचे ३८ मोबाईल आढळले. बाजारभावानुसार या मोबाईलची किंमत ४ लाख ७३ हजार २०० रुपये आहे. याशिवाय त्याच्याजवळून एक गुल्लर, हाताची घड्याळ, दोन पाकिट, एक चाकू असे साहित्य जप्त करण्यात आले. विविध ठिकाणावरून हे मोबाईल चोरी केल्याची कबुली त्याने दिली. आरपीएफचे जगदीश सोनी, विवेक कनोजिया, संजय खंडारे यांनी १५ बंद मोबाईल सुरू करून मोबाईलच्या मूळ मालकाशी संपर्क साधला. आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या सर्पुद करण्यात आले.
लोहमार्ग पोलीस करतात तरी काय ?
रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे मोबाईल, पाकीट चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रेल्वेस्थानकावर असामाजिक तत्त्वांचा उपद्रव वाढला असून रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोहमार्ग पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त करण्यात येत आहे. नव्यानेच नागपूर ठाण्याचा पदभार स्वीकारलेले निरीक्षक वासुदेव डाबरे हे गुन्हेगारांवर अंकुश लावण्यात यशस्वी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु पदभार स्वीकारून दोन महिने उलटूनही स्थिती जैसे थे असल्यामुळे ते गुन्हेगारांचा बंदोबस्त लावण्यात सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहेत. लोहमार्ग पोलीस अधीक्षकांनी रेल्वेस्थानकावरील असामाजिक तत्त्वांचा बंदोबस्त लावण्याची मागणी होत आहे.