पूर्व विदर्भात डेंग्यूचे ३८८ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 08:03 PM2019-09-23T20:03:39+5:302019-09-23T20:04:56+5:30
पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जानेवारी ते आतापर्यंत ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून रुग्णांची संख्या १८३ वर पोहचली आहे .
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पावसाचा जोर कमी होताच डेंग्यू पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जानेवारी ते आतापर्यंत ३८८ रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर जिल्ह्यात असून रुग्णांची संख्या १८३ वर पोहचली आहे तर दुसऱ्या क्रमांकावर चंद्रपूर जिल्हा आहे. येथे १७८ रुग्ण आहेत. या वर्षी पहिल्या डेंग्यू मृताची नोंद भंडाऱ्यात झाली आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
डेंग्यू हा विषाणूजन्य आजार आहे. ‘एडिस’ डासाच्या चावण्याने हा आजार होतो. डेंग्यूचा एक डास सुमारे १५०० डासाला जन्म घालतो. विशेष म्हणजे, दुसऱ्यांदा डेंग्यू झालेल्या रुग्णांमध्ये हा आजार जास्त गंभीर होतो. मात्र, जुन्या चुकांमधून धडा घ्यायला कुणीच तयार नाही. डेंग्यू डासांचा समूळ नाश करण्याची जबाबदारी सर्वांची असताना केवळ आरोग्य विभागावर जबाबदारी ढकलली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रशासनाकडे डासांशी मुकाबला करण्याची प्रभावशाली यंत्रणा नाही. त्यामुळे अत्यंत संवेदनशील व नाजूक आरोग्याच्या बाबतीत पूर्व विदर्भ डेंग्यूसारख्या धोक्याच्या मिठीत असल्याचे वास्तव आहे.
नागपूर शहरात १५० रुग्ण
डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. यात डेंग्यू रुग्णांची संख्याही वाढत असल्याने लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. या वर्षात आतापर्यंत नागपूर शहरात १५० रुग्ण तर ग्रामीणमध्ये ३३ रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या वर्षी २०१८ मध्ये ५४३ रुग्णांची नोंद झाली होती.
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्याची स्थिती
पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यातील १६२० डेंग्यू संशयित रुग्णांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. यात ३८८ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहेत. यात नागपूर जिल्ह्यातील १८३, चंद्रपूर ग्रामीणमध्ये ९३ तर शहरात ८५ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात १५, गोंदियात पाच रुग्ण तर भंडाऱ्यात सात रुग्ण व एका मृत्यूची नोंद झाली आहे.
सहा जिल्ह्यातील चार वर्षातील आकडेवारी
वर्षे डेंग्यू रुग्ण मृत्यू
२०१६ २५२ १
२०१७ ३२१ ६
२०१८ ११९० ११
२०१९ ३८८ १
जिल्हानिहाय डेंग्यूचे रुग्ण
जिल्हा रुग्ण
नागपूर १८३
चंद्रपूर १७८
भंडारा ७
गोंदिया ५
वर्धा १५