कंपनीचा संचालक असल्याचे सांगून बँकेला ३९.८५ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2022 10:10 PM2022-09-10T22:10:21+5:302022-09-10T22:12:23+5:30
Nagpur News कंपनीचा संचालक असल्याची बतावणी करून बजाजनगर परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेची ३९ लाख ८५ हजारांनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
नागपूर : कंपनीचा संचालक असल्याची बतावणी करून बजाजनगर परिसरात असलेल्या आयसीआयसीआय बँकेची ३९ लाख ८५ हजाराने फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
प्रकाश वाधवानी यांच्या ॲग्रो स्क्वेअर नावाच्या कंपनीचे रामदासपेठ येथील सेंट्रल बाजार मार्गावरील आयसीआयसीआय बँकेत करंट अकाऊंट आहे. या खात्याच्या माध्यमातून त्यांचे नियमित व्यवहार चालतात. २ सप्टेंबरला बँकेचे शाखा व्यवस्थापक विवेककुमार विजय चौधरी (३१, अध्यापक ले आऊट) यांना एका मोबाईलवरून फोन आला. यावेळी समोरील व्यक्तीने आपण कंपनीचे संचालक प्रकाश वाधवानी बोलत असल्याचे सांगून ई-मेलच्या माध्यमातून धनादेश क्रमांक पाठवून विविध कंपनीच्या खात्यात पैसे वळते करण्यास सांगितले. त्यानंतर दुपारी त्यांच्या कार्यालयात येऊन धनादेश घेऊन जाण्यास सांगितले. त्यानुसार चौधरी यांनी तीन खात्यावर २७ लाख ३५ हजार ट्रान्सफर केले.
पुन्हा त्याच मोबाईलवरून चौधरी यांना फोन आला आणि त्यांना एका खात्यावर १२ लाख ५ हजार पाठविण्यास सांगितले. दरम्यान चौधरी यांनी वाधवानी यांच्या ॲग्रो स्क्वेअर कार्यालयात संपर्क साधला असता वाधवानी यांनी हे व्यवहार केले नसल्याचे सांगण्यात आले. कोणीतरी बनावट क्रमांकावरून ४ खात्यावर ३९ लाख ८५ हजार ५०० रुपये वळते केल्याचे स्पष्ट झाले. फसवणूक झाल्याचे कळताच चौधरी यांनी बजाजनगर पोलिसात तक्रार दिली. बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
...........