विषबाधेच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2020 08:13 PM2020-02-12T20:13:29+5:302020-02-12T20:14:35+5:30
३२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित केली आहे. चौकशी समितीत दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ३२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित केली आहे. चौकशी समितीत दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. ज्या बचतगटाकडून शाळेला पोषण आहाराचा पुरवठा होत होता. त्यांच्याकडून काम काढून घेण्यात आले आहे.
हुडकेश्वर रोडवरील मारोतराव मुडे हायस्कूलमध्ये ७ सप्टेंबर रोजी ३२ मुलांना पोषण आहार खाल्याने विषबाधा झाली होती. या मुलांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. शाळेत पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट शगुन महिला बचत गटाला देण्यात आले होते. जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी चार सदस्यीय समिती गठित केली आहे. उपशिक्षणाधिकारी प्रकाश ढवंगळे यांच्या नेतृत्वात गठित करण्यात आलेल्या समितीत लेखाधिकारी मनीष मानमोडे, शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक गौतम गेडाम व सुजाता आगरकर यांचा समावेश आहे. समिती गुरुवारला पोषण आहार तयार करणाऱ्या स्थळाची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचाही बयाण नोंदविणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहाराच्या तपासणीचे नमुने पाठविले आहे. त्यांच्याकडून अद्यापही कोणत्याही प्रकारचा अहवाल आला नाही.
बचतगटाला यापूर्वी दिल्या होत्या नोटीस
या बचतगटाकडून पुरविण्यात येणाऱ्या आहारासंदर्भातील तक्रारी यापूर्वीच प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पण गटाकडून सातत्याने निष्काळजीपणा होत असल्याने अखेर पोषण आहाराने विद्यार्थ्यांच्या आरोग्य बिघडले.