चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जिवलगा पाहू! यात्रेसाठी एसटीच्या ४,३०० बसेस

By नरेश डोंगरे | Published: June 29, 2024 08:36 PM2024-06-29T20:36:02+5:302024-06-29T20:36:30+5:30

लालपरी चालती पंढरीची वाट : पुण्यातून सर्वाधिक तर मुंबईतून सर्वात कमी बसेसची सेवा

4 thousand 300 buses of st for pandharpur wari yatra | चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जिवलगा पाहू! यात्रेसाठी एसटीच्या ४,३०० बसेस

चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जिवलगा पाहू! यात्रेसाठी एसटीच्या ४,३०० बसेस

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : लाखो वैष्णवांचा मेळा सामावून घेणारी, राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणजेच पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाने तब्बल ४३०० बसेसची व्यवस्था केली आहे. विठूरायाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या राज्यातील गावोगावच्या भाविकांना या बसेस पंढरपूरची वारी घडविणार आहेत.

१३ ते २१ जुलै २०२४ या कालावधीत पंढरपूर यात्रा भरणार आहे. सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला येणारे राज्यासह अन्य राज्यातीलही लाखो भाविक या यात्रेत सहभागी होणार आहेत. त्यांना नेण्या-आणण्याची सेवा देण्यात कसलीही कसर राहू नये यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूर, अमरावती, नाशिक, पुणे, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या सहाही विभागांना आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना वजा आदेश देण्यात आले आहे. दर्शनाला निघण्यापासून तो दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर कोणत्याच विभागात बसेसची कमतरता राहणार नाही, याची खास काळजी घेण्याचे कळविण्यात आले आहे. प्रसंगी काही ठिकाणी उपरोक्त कालावधीसाठी बसेसचे पूर्वनियोजन करून ठेवले असेल तर ते रद्द करावे, असेही सांगण्यात आले आहे.

बसेस स्वच्छ आणि टापटीप असतील, त्या अगदी वेळेवर भाविकांच्या सेवेत राहतील, यासंबंधीची आगाऊ खबरदारी घेण्याचे निर्देशही महामंडळाच्या महाव्यस्थापकांनी सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना आणि राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना दिले आहे.

रिंगण वाहतूकीसाठी नागपूर, अमरावतीचे नियोजन

सोमवारी १५ जुलैला वाखरी (बाजीराव विहिर) येथे माऊलीचे रिंगण राहणार असून त्यासाठी चंद्रभागा बसस्थानकावरून भाविक मोठ्या संख्येत वाखरीला रिंगणाकरिता जाण्याचे संकेत आहेत. परिणामी या दिवशी मोठ्या संख्येत बसेसची आवश्यकता भासणार आहे. त्यानुसार, नागपूर आणि अमरावती विभागातून जास्तीत जास्त बसेस पाठविण्यात याव्यात, असे निर्देश या दोन्ही विभागाच्या प्रमूखांना देण्यात आले आहे.

सर्वाधिक बसेस पुणे, छ. संभाजीनगरातून

विठूरायाच्या पंढरपूर वारीसाठी सर्वाधिक ११५० बसेसची व्यवस्था पुणे विभागातून करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरातून १०५० बसेस, नाशिक ९५० बसेस, अमरावती ७०० बसेस, नागपूर २५० बसेस तर मुंबई विभागातून २०० बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.

बसस्थानके आणि विभागातील बसेसचे संचालन

प्रवाशांना येण्याजाण्यासाठी सोयीचे व्हावे आणि बसचालक, वाहकांनाही अडचण होऊ नये म्हणून राज्यातील बसेसच्या संचालनाचे वेगवेगळ्या बसस्थानकांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी स्वतंत्र चार बस स्थानकांची व्यवस्था करण्या आली आहे. त्यानुसार, चंद्रभागा बसस्थानकात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सातारा, पुणे आणि पंढरपूर आगाराच्या बसेस थांबणार आहेत. भिमा यात्रा देगाव बसस्थानकात छ. संभाजीनगर, नागपूर आणि अमरावतीच्या बसेस थांबतील. विठ्ठल कारखाना बसस्थानकात नाशिक विभागातील तसेच पांडूरंग बसस्थानकातून सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग विभागाच्या बसेसचे संचालन होणार आहे.

Web Title: 4 thousand 300 buses of st for pandharpur wari yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.