४० डॉक्टर्स देणार हिवाळी अधिवेशनात सेवा; तीन अस्थायी इस्पितळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 10:09 AM2017-12-11T10:09:14+5:302017-12-11T10:09:38+5:30
हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने नागपुरात येणाऱ्या मंत्र्यांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी मेयो, मेडिकल व सार्वजनिक आरोग्य विभागाची असते. या अधिवेशनात तीन अस्थायी इस्पितळे उभारण्यात आली आहे.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्यानिमित्ताने नागपुरात येणाऱ्या मंत्र्यांसह शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची जबाबदारी मेयो, मेडिकल व सार्वजनिक आरोग्य विभागाची असते. या अधिवेशनात तीन अस्थायी इस्पितळे उभारण्यात आली आहे. यात सुमारे ४० डॉक्टर आपली सेवा देणार आहेत. शनिवारी याच्या तयारीची बैठक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे यांच्या उपस्थितीत पार पडली.
मेयो, मेडिकल व आरोग्य विभागाच्या सहकार्याने आमदार निवास, रविभवन आणि विधान भवन परिसरात तीन अस्थायी इस्पितळे सुरू करण्यात येतात. मंत्र्यांच्या बंगल्यांवरही डॉक्टरांना वैद्यकीय सेवा द्यावी लागते. मोर्चे व धरणे पॉर्इंट येथेही डॉक्टरांचे एक पथक तैनात केले जाते. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकेची सेवाही घेतली जाते. या सर्वांवर आजच्या बैठकीत चर्चा झाली. सोबतच कामाचे वाटप करण्यात आले. अस्थायी इस्पितळांमध्ये लागणाऱ्या उपकरणांच्या जुळवाजुळवीसह गोंदिया मेडिकलमधून डॉक्टर बोलविणाऱ्यावरही चर्चा झाल्याची माहिती आहे. या बैठकीला मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांच्यासह दोन्ही रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी व डॉक्टर उपस्थित होते.