पेट्रोल पंप मिळवून देण्याच्या नावाखाली ४० लाख हडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:08 AM2020-12-22T04:08:58+5:302020-12-22T04:08:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - पेट्रोल पंप मिळवून देण्याच्या नावाखाली पेट्रोल पंप संचालक आशुतोष मुंदडाने ४० लाख रुपये घेऊन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - पेट्रोल पंप मिळवून देण्याच्या नावाखाली पेट्रोल पंप संचालक आशुतोष मुंदडाने ४० लाख रुपये घेऊन आपली फसवणूक केल्याची तक्रार कळमन्यातील एका व्यापाऱ्याने पोलीस आयुक्तांकडे केली आहे. प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी गुन्हे शाखेला चौकशीचे आदेश दिले आहे. या घडामोडीमुळे धोकेबाजी करून पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने पीडितांवर दडपण आणू पाहणाऱ्या कंपूची धावपळ वाढली आहे.
सागर माणिकराव येळणे असे तक्रार करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते कळमन्यात धान्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०१८ मध्ये पेट्रोल पंपासंबंधीची जाहिरात आली होती. त्यानुसार सागर येळणे यांनी एचपी आणि इंडियन ऑईलमध्ये अर्ज भरला. यासंबंधाने ते इंडियन ऑईलमध्ये गेले असता त्यांची आशुतोष मुंदडासोबत ओळख झाली. आपले तीन पेट्रोल पंप असून, कंपनीच्या उच्चाधिकाऱ्यांसोबत चांगली ओळख आहे. कन्सल्टन्सीसुद्धा चालवतो. तुम्ही रक्कम खर्च करायला तयार असाल तर पेट्रोल पंप मिळवून देण्यापासून तो इस्टाॅब्लीशमेंटपर्यंतचे सर्व काम करून देऊ, असे मुंदडाने सांगितले. मुंदडाच्या वागण्या-बोलण्याचा विश्वास वाटल्याने येळणेने रक्कम खर्च करण्याची तयारी दाखविली. त्यानंतर ५ फेब्रुवारी २०१९ पासून तो सप्टेंबर २०२० पर्यंत मुंदडाने वेगवेगळी कारणे आणि व्यक्तीची नावे सांगून ४० लाख २० हजार ९७० रुपये घेतले, मात्र पेट्रोल पंप मिळवून दिला नाही. अलीकडे मुंदडाचा संशय आल्याने येळणेंनी पेट्रोल पंपाच्या एनओसीचा तगादा लावला. त्यानंतर मुंदडाने टाळणे सुरू केले. चौकशीत पेट्रोल पंपाला एनओसी मिळालीच नाही, असेही स्पष्ट झाले. त्यामुळे येळणेंनी आपली रक्कम परत मागितली. पोलिसात तक्रार करण्याचाही इशारा दिला. त्यावर खोटे यूटीआर नंबर देऊन मुंदडाने रक्कम परत केल्याचे भासवले. प्रत्यक्षात रक्कम परत केली नाही. त्यामुळे येळणेंनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना प्रत्यक्ष भेटून तक्रार दिली. आयुक्तांनी हे प्रकरण लगेच आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविले. चौकशी करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही दिले.
---
धक्कादायक खुलासे अपेक्षित
मुंदडाने एनओसी मिळवून देण्यासाठी मंत्र्याच्या पीएच्या नावानेही ९.५० लाख रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. धाक दाखविण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याच्या नावाचाही मुंदडाच्या साथीदारांनी गैरवापर चालवला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिकच वाढले आहे. कसून चौकशी झाल्यास या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
---