ट्रकमध्ये वरून कोळशाची राख, चोरकप्प्यात दारूचे घबाड; ४० लाखांची प्रतिबंधित दारू जप्त
By नरेश डोंगरे | Published: June 25, 2024 10:44 PM2024-06-25T22:44:57+5:302024-06-25T22:46:07+5:30
‘पुष्पा’स्टाईल दारूची तस्करी : ट्रकमालक फरार, चालक, वाहक गजाआड
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : ट्रकमध्ये चारही बाजूला कोळशाची राख आणि आतमध्ये मात्र मोठ्या प्रमाणात दारूचे घबाड, अशा प्रकारे प्रतिबंधित विदेशी बनावटीच्या दारूची 'पुष्पा स्टाईल' तस्करी करणाच्या टोळीचा छडा आज राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाने लावला. ट्रकसह ४० लाखांची दारू जप्त करून दोघांना अटक करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाची अलिकडच्या कालावधीतील ही सर्वात मोठी कारवाई आहे.
मध्य प्रदेशात मोठ्या प्रमाणात विदेशी दारू निर्माण केली जाते. ही दारू बनावट मानली जाते. ती आरोग्यास अपायकारक असल्यामुळे ईतर राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असते. तिला केवळ मध्य प्रदेशातच विकण्याची परवानगी असल्यामुळे त्याच ब्राण्डच्या दारूच्या तुलनेत या दारूची किंमत फारच कमी असते. त्यामुळे नागपूरसह ठिकठिकाणचे मद्य तस्कर ही दारू बोलवून बिनधास्तपणे हॉटेल, बार, रेस्टॉरेंट आणि ढाब्यावर विकतात. अशाच वेगवेगळ्या ब्राण्डच्या दारूची मोठी खेप नागपुरात येणार असल्याची टीप एक्साईजच्या स्थानिक अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यामुळे अधीक्षक सूरजकुमार रामोड यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साईच्या पथकाने ऑटोमोटीव्ह चाैक ते कळमना मार्गावर विनोबा भावे नगरात सापळा रचला. खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी ट्रक क्रमांक एमएच ४०/ सीडी २२६० टप्प्यात येताच तो थांबविण्यात आला. ट्रकची पाहणी केली असता त्यात कोळशापासून तयार झालेली राख भरून दिसली. आतमध्ये तपासले असता राखच राख दिसली. त्यामुळे तपासणी करणारे पथक चक्रावले. त्यांनी ट्रकमध्ये काहीच नसल्याचा अंदाज बांधला.
अन् चोर कप्पा आढळला
ट्रकच्या कॅबिनची कसून तपासणी केली असता चालकाच्या सीटमागे प्लायवूड लावून दिसले. संशय आल्याने ते बाहेर काढले असता त्यातून एक चोर दरवाजा आढळला. आतमध्ये ५ फुट उंच, १५ फुट लांब आणि ट्रकचा गाला ज्या आकाराचा, त्या आकाराचे एक भुयार कम लॉकर आढळले. त्यात मोठ्या प्रमाणात बियर कॅन आणि वेगवेगळ्या ब्राण्डची दारू आढळली. ती जप्त करून ट्रकचालक सतिश दिलीप सोनवणे तसेच सहायक योगेश जानरावजी धुर्वे या दोघांना अटक करण्यात आली. हा ट्रक विशाल आनंद जांबुळकर याच्या मालकीचा असून, तो फरार आहे. या टोळीत अनेक मद्य तस्करांचा सहभाग असल्याची चर्चा आहे.
जप्त करण्यात आलेली बियर आणि दारू
ले माउंट ब्रण्डच्या ५०० मिलीच्या ७२० बिअर कॅन, 'गोवा' व्हिस्कीच्या १८० मिलिच्या १२५०० बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४८० बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४८० बाटल्या आणि इंम्पेरियल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलिच्या ४८० बाटल्या. ही सर्व दारू, ट्रक दोन मोबाईलसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत ४० लाख, ५१ हजार रुपये आहे. एक्साईज एसपी सुरजकुमार रामोड, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नागपूर यांचे मार्गदर्शनाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली द्वितिय निरीक्षक रणधिर गार्दैडे तसेच मंगेश कावळे, शैलेश अजमिरे, मोहन पाटील, उमेश शिरभाते, योगेश यलसटवार, शिरीष देशमुख, समिर सईद, विनोद ठाकुर, प्रशांत घावळे, स्नेहा पवार, धवल तिजारे आणि देवेश कोठे यांनी ही कारवाई केली.