४० टक्के नागपूरकरांना हृदयरोगाचा धोका
By admin | Published: September 29, 2015 04:05 AM2015-09-29T04:05:04+5:302015-09-29T04:05:04+5:30
उपराजधानीने स्मार्ट सिटीकडे वाटचाल केली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे नागपूरकरांच्या आरोग्यविषयक
नागपूर : उपराजधानीने स्मार्ट सिटीकडे वाटचाल केली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे नागपूरकरांच्या आरोग्यविषयक समस्यांही वाढल्या आहेत. जानेवारी २०१४ ते आॅगस्ट २०१५ दरम्यान झालेल्या एका सर्वेक्षणात १७,६४७ लोकांच्या आरोग्याची तपासणी केली असता २५ ते ४० टक्के नागपूरकरांमध्ये हृदयरोगाचा धोका वाढल्याचे आढळून आले. या पाहणीत पुरुषांसोबतच महिलाही हृदयरोग, स्थुलता, रक्तदाब आदीने ग्रस्त असल्याचे दिसून आले.
आईच्या गर्भामध्ये असल्यापासून हृदयाचे काम सुरू होते, ते अखेरचा श्वास घेईपर्यंत सुरूच असते. जन्मापासून अखेरपर्यंत अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या शरीराचा हा एकमेव महत्त्वपूर्ण असा अवयव आहे, त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. यासाठी सर्वांनी हृदयाशी मैत्री करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. इंडस हेल्थ व एका खासगी रुग्णालयाकडून नुकतेच एक सर्वेक्षण झाले. यात हृदयातील रक्त वाहून नेणारी धमणी अंकुचित होण्याचे (आर्टरीज ब्लॉकेज) प्रमाण वाढल्याचे दिसून आले.
उच्च रक्तदाबाशी संबंधित हृदयाचे आजाराचे प्रमाण सर्व वयात ७ ते १० टक्क्यांने वाढले आहे. लोकांमध्ये हृदयरोग वाढण्याचे सर्वात मोठे कारण ‘तणाव’ सांगितले जात आहे. युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण गतीने वाढत आहे. या सोबतच प्रदूषण, धूम्रपान, व्यायामाचा अभाव व आहाराच्या बदललेल्या सवयी हे मुख्य कारण आहे.
सर्वेक्षणानुसार १० टक्के शहरी आणि ७ टक्के ग्रामीण हृदयाशी संबंधित आजाराने ग्रस्त आहेत. स्थुलतेमुळे ३५ ते ४५ टक्के लोकांना धोका निर्माण झाला आहे. तेलकट आणि चरबीयुक्त खाद्यामुळे स्थुलता मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
याकडे दुर्लक्ष केल्यास हृदय रोग
वारंवार छातीत दुखणे, अॅसिडीटी, अचानक श्वास घेताना येत असलेली अडचण या लक्षणाकडे रुग्ण दुर्लक्ष करतात. वेळीच उपचार घेत नाहीत. यामुळे भविष्यात गंभीर हृदय रोगाला सामोर जावे लागते. सर्वेक्षणात हे लक्षात आले की १५ ते २० टक्के लोकांना हृदयाचा आजार आहे हे कळल्यानंतरही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा की ते त्यांच्यासाठी घातक आहे. यामुळे प्रत्येकवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे व त्याचे पालन करणे आवश्यक आहे.
१७,६४७ लोकांवर झालेल्या सर्वेक्षणातील तथ्य : तणाव हे सर्वात मोठे कारण
धूम्रपान करणाऱ्यांना अचानक हार्ट अटॅकचा धोका
सिगारेटच्या धुरात कार्बन मोनॉक्साईडचे प्रमाण बऱ्यापैकी असते. प्रदूषित हवेमधून जेवढ्या प्रमाणात हा वायू शरीरात जाऊ शकतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात सिगारेटच्या धुरामुळे जातो. रक्तामध्ये प्राणवायू (आॅक्सिजन) पेक्षा हा जास्त प्रमाणात शोषला जातो. त्यामुळे धुराबरोबर हा वायू अधिक आणि प्राणवायू कमी प्रमाणात शोषला गेल्यामुळे साहजिकच शरीरातील पेशींना आॅक्सिजन कमी मिळतो. यामुळे धमणीकाठिण्य वाढते. अशाप्रकारे नियमितपणे धूम्रपान करणाऱ्यांमध्ये अचानक हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो.
-डॉ. आनंद संचेती, प्रसिद्ध हृदय शल्यचिकित्सक
असे आहे सर्वेक्षणातील तथ्य
ंसर्वेक्षणात ९३२१ पुरुष तर ८३२६ महिलांची तपासणी करण्यात आली.
ंयात व्हिटॅमिन बी १२ ची कमी २४.२१ टक्के महिलांमध्ये तर १९.१४ टक्के पुरुषांमध्ये दिसून आली.
ंउच्च रक्तदाबाची समस्या ३६.२७ पुरुषांमध्ये तर ३४.२९ टक्के महिलांमध्ये दिसून आली.
ंहृदयविकार २५.२८ टक्के पुरुषांत तर २७.०८ टक्के महिलांमध्ये आढळून आला.
ंहृदय रोगाचे मुख्य कारण ठरलेली स्थुलता ही पुरुषांमध्ये ३९.२८ टक्के तर ३३.२७ टक्के महिलांमध्ये दिसून आली.
ंहायपरलिपेमिया (रक्तात अधिक प्रमाणात चरबी व लिपीड्स असणे) किंवा एथेरोस्क्लेरॉसिसचे प्रमाण २४.३८ टक्के पुरुषांमध्ये तर २५.३८ टक्के महिलांमध्ये दिसून आले.