४० टक्के मुलांचे दात किडलेले; शासकीय दंत रुग्णालयाने केली तीन हजार बालकांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 09:24 PM2023-02-10T21:24:22+5:302023-02-10T21:24:55+5:30
Nagpur News मौखिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने मागील काही दिवसांत शाळेतील ३ हजार मुलांची दंत तपासणी केली. यातील ४० टक्के मुलांच्या दातांना कीड लागल्याचे दिसून आले.
नागपूर : मौखिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाने मागील काही दिवसांत शाळेतील ३ हजार मुलांची दंत तपासणी केली. यातील ४० टक्के मुलांच्या दातांना कीड लागल्याचे दिसून आले.
शाळेकरी मुलांमध्ये दातांना कीड लागण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यावर वेळीच उपचार केल्यास दात वाचविणे शक्य होते. याची दखल घेत मौखिक आरोग्य दिनाचे निमित्त साधून रुग्णालयाचा सामाजिक दंतशास्त्र विभागाने पुढाकार घेत विविध शाळांमधील ३ हजार विद्यार्थ्यांची दंत तपासणी केली. १ हजार २०० विद्यार्थ्यांच्या दाताला कीड लागल्याचे आढळून आले. यातील ५०० विद्यार्थ्यांना ‘स्केलिंग’ आणि ‘टॉपिकल फ्लोराइड जेल’सारखे उपचार देण्यात आले. सोबतच योग्य ब्रशिंग तंत्राचे प्रात्यक्षिकही देण्यात आले.
दाताच्या आरोग्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होण्यासाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यातील विजेत्या स्पर्धकांना अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. सचिन खत्री, डॉ. शिल्पा वर्हेकर, डॉ. नूपुर कोकणे आणि डॉ. अनिकेत धोटे यांनी सहकार्य केले.