आयसीयूतील ४० टक्के मृत्यू ‘सेप्सिस’मुळे; अँटिबायोटिक्सचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2022 09:20 PM2022-11-04T21:20:37+5:302022-11-04T21:21:14+5:30

Nagpur News अतिदक्षता विभाग म्हणजे ‘आयसीयू’मध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० ते ४० टक्के मृत्यू हे ‘सेप्सिस’मुळे होतात, अशी माहिती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अतिदक्षता औषधोपचार विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी दिली.

40 percent of ICU deaths are due to sepsis; Antibiotics should be used only under medical advice | आयसीयूतील ४० टक्के मृत्यू ‘सेप्सिस’मुळे; अँटिबायोटिक्सचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा 

आयसीयूतील ४० टक्के मृत्यू ‘सेप्सिस’मुळे; अँटिबायोटिक्सचा वापर वैद्यकीय सल्ल्यानेच करावा 

Next
ठळक मुद्दे इंटरनॅशल क्रिटिकल केअर अपडेट परिषदेला सुरुवात

नागपूर : कुठल्याही इन्फेक्शनला शरीराचा तीव्र प्रतिसाद म्हणजे ‘सेप्सिस’. ही एक गंभीर परिस्थिती असून, यावर योग्य वेळेत उपचार न मिळाल्यास ‘टिश्यू’ला हानी पोहोचून विविध अवयव निकामी होण्याचा धोका निर्माण होतो. अतिदक्षता विभाग म्हणजे ‘आयसीयू’मध्ये होणाऱ्या एकूण मृत्यूपैकी ३० ते ४० टक्के मृत्यू हे ‘सेप्सिस’मुळे होतात, अशी माहिती मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या अतिदक्षता औषधोपचार (क्रिटिकल केअर मेडिसिन) विभागाचे विभाप्रमुख प्रा. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी दिली.

‘इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन’द्वारे (आयएससीसीएम) दुसऱ्या ‘इंटरनॅशनल क्रिटिकल केअर अपडेट’चे आयोजन नागपुरातील एका खासगी हॉटेलमध्ये करण्यात आले होते, यावेळी ते तज्ज्ञ वक्ता म्हणून बोलत होते. परिषदेचे अध्यक्ष डॉ. निर्मल जयस्वाल, ‘आयएससीसीएम’ नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. कमल भूतडा, सचिव डॉ. अनंतसिंह राजपूत, डॉ. अनिल जवाहराणी, डॉ. स्वप्ना खानझोडे, डॉ. चेतन शर्मा, डॉ. पारस झुणके आदी उपस्थित होते. ‘सेप्सिस सिन्ड्रोम’चे महत्त्वाचे कारण कुठल्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय अँन्टिबायोटिक्सचे सेवन हे होय. त्यामुळे स्वत:हून अँन्टिबायोटिक्स घेण्याऐवजी तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहनही डॉ. कुलकर्णी यांनी केले.

-इन्फेक्शनमुळे सेप्सिस होण्याचा धोका

कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन झाल्यास सेप्सिस होण्याचा धोका संभवतो. विशेषत: जे रुग्ण ६५ वर्षांवरील आहेत, ज्यांना मधुमेह, फुप्फुसांचे आजार, कर्करोग आणि मूत्रपिंडाच्या विकारांसारखे दीर्घकालीन आजार झाले, ज्यांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे त्यांना सेप्सिसची जोखीम अधिक असल्याचे डॉ. कुलकर्णी म्हणाले.

-मेंदूवर दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो

डॉ. निर्मल जयस्वाल म्हणाले, जर तीव्र सेप्सिसमधून रुग्ण बरा झाला तरी सेप्सिसमुळे ज्या आंतरिक अवयवांवर आणि टिश्यूंवर आघात झालेला असतो, त्या रुग्णांना बरे होण्यास काही आठवडे अथवा महिने लागू शकतात. ज्यांना तीव्र सेप्सिस अथवा सेप्टिक शॉकला सामोरे जावे लागले, त्यांच्या मेंदूवर दीर्घकालीन प्रभाव पडू शकतो.

-अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर शिकणे गरजेचे

गुडवाव येथील लिव्हर ट्रान्सप्लांट आयसीयूचे संचालक डॉ. दीपक गोविल म्हणाले की, अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाच्या माध्यमाने गंभीर रुग्णांच्या आजाराचे निदान झाल्यास त्वरित औषधोपचाराची दिशा ठरविता येणे शक्य आहे. यामुळे ‘आयसीयू’मधील डॉक्टरांनी (इंटेंसिव्हिस्ट) अल्ट्रासाउंड तंत्रज्ञानाचा वापर शिकणे गरजेचे आहे. रुग्णांचा जीव वाचविणे अधिक शक्य होते.

Web Title: 40 percent of ICU deaths are due to sepsis; Antibiotics should be used only under medical advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य