नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ४० हजार कर्मचारी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 09:23 PM2019-03-11T21:23:29+5:302019-03-11T21:35:13+5:30
सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी तब्बल ४० हजार कर्मचारी सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी तब्बल ४० हजार कर्मचारी सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.
जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे तत्काळ प्रभावाने नागपूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व राजकीय पक्ष, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था तसेच प्रशासकीय नियंत्रणाखालील महामंडळे, सार्वजनिक उपक्रम आदींना निर्देश जारी करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामात २८ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ५ ते ६ हजार कर्मचारी इतर कामांसाठी लागतात. अशी एकूण ३५ ते ३६ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहेत. प्रत्यक्षात ४० हजार कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, मनपा आयुक्त अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक ओला, नासुप्र सभापती शीतल उगले, सीईओ संजय यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.
नामांकन अर्ज दाखल करण्याची
नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १८ मार्चपासून
लोकसभा निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकरी अश्विन मुदगल यांनी दिली.
नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रात मतदानासाठी ४३८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात रामटेक मतदारसंघात २३४५ तर नागपूर मतदारसंघात २०३७ मतदार केंद्रे आहेत. यापैकी ८२ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. यात ५२ केंद्रे शहरात तर ३० केंद्रे रामटेक लोकसभा मतदार संघात आहेत. या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त किंवा सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.
असा आहे कार्यक्रम
- १८ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात
- २५ मार्च अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
- २६ मार्चला अर्जाची छाननी
- २८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल
- ११ एप्रिलला मतदान
- २३ मे रोजी मतमोजणी
नागपूर लोकसभा : विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार केंद्राची संख्या
दक्षिण- पश्चिम - ३७२
दक्षिण नागपूर - ३४४
पूर्व नागपूर - ३३४
मध्य नागपूर - ३०५
पश्चिम नागपूर - ३३१
उत्तर नागपूर - ३५१
रामटेक लोकसभा : विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रांची संख्या
काटोल - ३२८
सावनेर - ३६४
हिंगणा - ४३३
उमरेड - ३८३
कामठी - ४८०
रामटेक - ३५७
कायदा व सुव्यवस्थेसाठी नऊ हजारावर पोलीस कर्मचारी तैनात : भूषणकुमार उपाध्याय
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तब्बल ८ ते ९ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेत दिली.
डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, तब्बल ६ हजार पोलीस कर्मचारी, १ हजार पोलीस अधिकारी, १५०० होमगार्ड तैनात राहतील. यासोबतच सीआरपीएफच्या दोन कंपनीही देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात फ्लॅग मार्च काढण्यात येईल. निवडणुकीमध्ये जी असामाजिक तत्त्वांची मंडळी गडबड करू शकतात अशा लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. यासोबतच इतर संवेदनशील लोकांविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. वॉण्टेड लोकांची यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. तसेच गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.
१२५ ठिकाणी अचानक होणार नाकेबंदी
नागपुरातील १२५ ठिकाणे अशी निश्चित करण्यात आली आहेत. जिथे वाहतूक आणि पोलीस विभाग मिळून अचानक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करतील. जेणेकरून दारूचा साठा किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर काही अवैध कृत्य होऊ नयेत.
नागपूर सीमेवर अतिरिक्त सुरक्षा पथक
नागपूर जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेशातून नागपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होता कामा नये किंवा मतदानाच्या दिवशी तिकडील लोक इकडे येता कामा नये, यासाठी सीमवेर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येईल. तसेच विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असून १३ तारखेला दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.