नागपूर जिल्ह्यात ४० टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:04+5:302021-07-14T04:11:04+5:30
नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या गंभीर परिणामाला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हाच पर्याय आहे, परंतु ४२ लाख ...
नागपूर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या गंभीर परिणामाला दूर ठेवण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण हाच पर्याय आहे, परंतु ४२ लाख लोकसंख्या असलेल्या नागपूर जिल्ह्यात ‘कधी बंद तर कधी चालू’ असलेल्या लसीकरणामुळे सहा महिने होऊनही ३९.७९ टक्के म्हणजे, १६,७१,३५३ लाभार्थ्यांचेच लसीकरण झाल्याने धोका वाढला आहे. यातही दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ४,०३,८१३ असून याची टक्केवारी केवळ ९.६१ टक्के आहे.
‘डेल्टा प्लस’ विषाणूशी लढा देण्यासाठी, एवढेच नव्हे तर कठोर निर्बंधांमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रत्येकाचे लसीकरण आवश्यक आहे. परंतु प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ‘हेल्थ वर्कर’ला प्राधान्य देण्यात आले. तरीही ६५,०५५ जणांनी पहिला तर ३६,८२८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला. जवळपास २८,२२७ कर्मचारी दुसऱ्या डोसपासून वंचित आहेत. रुग्णसेवेत असलेल्यांची ही संख्या चिंता निर्माण करणारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-साठा उपलब्ध झाल्यावरच १८ वर्षांवरील तरुणांना लस
लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ‘फ्रंट लाइन वर्कर’ना लस देण्यात आली. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या ११८४१२, तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ४१५७७ आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या निम्म्याहून कमी आहे. १८ वर्षांवरील तरुणांचे पुन्हा लसीकरण सुरू झाले. परंतु लसीचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्यावरच त्यांना संधी दिली जात आहे. सध्या १८ ते ४४ या वयोगटात २६३५९१ पहिला डोस, तर १०६२९ तरुणांना दुसरा डोस देण्यात आला.
-सर्वाधिक लसीकरण ६० वर्षांवरील वयोगटात
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सर्वाधिक मृत्यू ४५ वर्षांवरील वयोगटात झाले आहेत. असे असताना ४५ ते ६० वयोगटातील ४७०२६० लोकांना पहिला डोस, तर १५३४९१ लोकांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंतच्या लसीकरणामध्ये सर्वाधिक लसीकरण ६० व त्यावरील वयोगटात झाले. ३४९८६२ पहिला, तर १६१२८८ ज्येष्ठांना दुसरा डोस देण्यात आला.
एकूण पहिला डोस : १२६७५४०
एकूण दुसरा डोस : ४०३८१३
एकूण दोन्ही डोस : १६,७१,३५३
लाभार्थी : पहिला डोस : दुसरा डोस
हेल्थ वर्कर : ६५०५५ : ३६८२८
फ्रंट लाइन वर्कर : ११८४१२ : ४१५७७
१८ ते ४४ वयोगट : २६३५९१ : १०६२९
४५ ते ६० वयोगट : ४७०२६० : १५३४९१
६१ व त्यावरील वयोगट : ३४९८६२: १६१२८८