४० वर्षे जुन्या संचाने नाेंदविला विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:26 AM2020-12-04T04:26:59+5:302020-12-04T04:26:59+5:30
दिनकर ठवळे कोराडी : महानिर्मितीच्या इतिहासात ४० वर्षे जुने असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित कोराडी येथील संच क्रमांक ६ व ७ ...
दिनकर ठवळे
कोराडी : महानिर्मितीच्या इतिहासात ४० वर्षे जुने असलेल्या तंत्रज्ञानावर आधारित कोराडी येथील संच क्रमांक ६ व ७ (२१० मेगावॅट) मधून तब्बल १५ महिन्याच्या विश्रांतीनंतर गुरुवारी वीज निर्मितीला सुरुवात झाली. आश्चर्य म्हणजे २१० मेगावॅटला वापरलेले महानिर्मितीचे हे तंत्रज्ञान जुने व कालबाह्य समजले जात असले तरीही येथील संच क्रमांक ६ ने आपल्या क्षमतेपेक्षा जास्त (एकूण २३२ मेगावॅट) वीज निर्मिती केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ४० वर्षातील या संचाची ही कामगिरी ऐतिहासिक असल्याने महानिर्मितीमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
‘एमईआरसी’च्या निर्देशानुसार विजेची मागणी व पुरवठा यातील तारतम्य साधण्यासाठी महानिर्मितीला अनेकदा आपले संच बंद ठेवण्याचे, प्रसंगी सुरू करण्याचे आदेश दिले जातात. मध्यंतरीच्या काळात विजेची मागणी उत्पादनापेक्षा जास्त असल्याने कोराडी येथील ४० वर्षे जुने संच क्रमांक ६ व ७ यांना महावितरणकडून बंद करण्याचे आदेश देण्यात आले. अर्थात ज्या वीजनिर्मिती संचाची वीज उत्पादन किंमत ही जास्त असेल त्यांना बंद ठेवण्याचे आदेश दिले जातात. या नियमानुसार कोराडीतील जुने संच बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. तेव्हापासून येथील सर्व नियमित कर्मचारी, अधिकारी व कंत्राटी कामगारांना विनाकामाने वेतन दिले जात आहे.
काही दिवसांपासून विजेची मागणी वाढल्याने महावितरणने कोराडीतील बंद असलेले संच सुरू करण्याचे आदेश सोमवारी दिले. आदेश प्राप्त होताच येथील मुख्य अभियंता राजकुमार तासकर यांनी आपल्या चमूसह हे संच प्रज्वलित करण्याची प्रक्रिया प्रारंभ केली. मंगळवार (दि.१) पासून ही प्रक्रिया प्रारंभ झाल्यानंतर बुधवारी रात्री या संचापासून विजेचे उत्पादन मिळायला सुरू झाले. गुरुवारी (दि.३) पूर्ण क्षमतेने हे संच काम करायला लागले असताना संच क्रमांक ६ ची पूर्ण क्षमता २१० मेगावॅट असताना या संचातून २३२ मेगावॅट वीजनिर्मिती नोंदविण्यात आली. संच क्रमांक ७ मधून मात्र १५० मेगावॅट वीज मिळाली असून, याचेही उत्पादन वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
साधारणत: क्षमतेपेक्षा कमी वीजनिर्मिती होणे हे सर्वांसाठी सामान्य समजले जाते. मात्र येथील संच क्रमांक ६ ने आपला विक्रम केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त हाेत आहे. चार वर्षापूर्वी पहिल्या टप्प्यात संच क्रमांक १ ते ४, दुसऱ्या टप्प्यात संच क्रमांक ५ ते ७ सुरू करून कोराडीचे नाव वीजनिर्मितीत सर्वत्र चर्चेत आले.