२०५० पर्यंत भारतातील ४० कोटी महिलांना ‘ॲनिमिया’! - डॉ. श्रीनाथ रेड्डी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2022 11:12 AM2022-05-16T11:12:45+5:302022-05-16T13:38:22+5:30
‘अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एएमएस) व ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.
नागपूर : हवामानातील बदल म्हणजे केवळ हिमनदी वितळणे आणि समुद्राची पातळी वाढणे एवढेच नाही, तर सार्वजनिक आरोग्यावर त्याचा प्रचंड वाईट परिणाम होतो. २०५० पर्यंत भारतातील सुमारे ४० कोटी महिला व १० कोटी मुलांना शरीरात हिमोग्लोबिनचा कमतरतेमुळे ‘ॲनिमिया’ होण्याचा धोका राहील. कोविडपेक्षाही वाईट परिणाम होतील, असे धक्कादायक वक्तव्य पद्मभूषण व ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन’चे अध्यक्ष डॉ. के. श्रीनाथ रेड्डी यांनी येथे केले.
‘अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेस’ (एएमएस) व ‘डायबेटिक असोसिएशन ऑफ इंडिया’ (डीएआय) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. मंचावर डॉ. शरद पेंडसे, डॉ. जय देशमुख, ‘एएमएस’चे अध्यक्ष डॉ. रवींद्र सरनाईक, डॉ. राजू खंडेलवाल, ‘डीएआय’चे अध्यक्ष डॉ. प्राजक्ता देशमुख, डॉ. नैनेश पटेल, डॉ. प्रशांत जोशी व डॉ. पीयूष खेरडे उपस्थित होते.
हवामान बदलाच्या परिणामांबाबत जागरूक होणे गरजेचे
डॉ. रेड्डी म्हणाले, हवामान बदलाच्या वास्तविक परिणामांबद्दल प्रत्येकाने जागरूक होणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. दुष्परिणाम इतक्या सहजासहजी थांबवणे शक्य नाही. झाडे लावणे आणि पाण्याची बचत करणे पुरेसे नाही. बदलता काळ कसा अंगीकारायचा हे देखील शिकले पाहिजे.
नागपूरसह दोन शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’
पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडिया’ने (पीएचएफआय) नागपूरसह अहमदाबाद, भुवनेश्वरसारख्या शहरांसाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’ तयार केला आहे. या योजनेचे स्थानिक प्रशासनाकडून योग्य पालन होणे गरजेचे आहे. विशेषत: उष्णतेपासून बचाव करण्यासाठी निवारे, पाण्याच्या सोयी उभ्या करायला हव्यात. ड्युटी तासही बदलायला हवे. शिवाय खासगी वाहने कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मजबूत करणे, अधिकाधिक झाडे लावणे आदी उपायांची गरज असल्याचे डॉ. रेड्डी म्हणाले.
आता कोरोनाची प्राणघातक लाट नसणार
एका प्रश्नाच्या उत्तरात डॉ. रेड्डी म्हणाले, कोरोना प्रतिबंधक लसीकरण व वाढलेल्या रोग प्रतिकारशक्तीमुळे नजीकच्या काळात कोरोनाची चौथी लाट येईल, पण ती प्राणघातक नसणार. कोरोनामुळे भारतात झालेल्या मृत्यूची संख्या उपलब्ध माहितीपेक्षा अधिक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे; परंतु भारतातील २०२१ मधील कोरोना मृत्यूची अद्ययावत माहिती पुढे आलेली नाही. आली तरी त्यात फारसा फरक असेल असे वाटत नाही.