चार टप्प्यात ४० हजार झाडांचा जाणार बळी? एनएचएआयची झाकली मूठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 11:31 AM2021-06-12T11:31:57+5:302021-06-12T11:32:17+5:30
Nagpur News आयएमएस प्रकल्पासाठी ४९३० झाडे ताेडली जाणार असल्याचा दावा एनएचएआयकडून केला जात आहे तर हा संपूर्ण प्रकल्प चार टप्प्यात असून त्यात ४० हजार झाडांचा बळी जाणार असल्याची भीती पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे (एनएचएआय) अजनी इंटर माॅडेल स्टेशन (आयएमएस) प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न केला जात असताना दुसरीकडे झाडे वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यावरण कार्यकर्त्यांनी आंदाेलनाचा वेग वाढविला आहे. या प्रकल्पासाठी ४९३० झाडे ताेडली जाणार असल्याचा दावा एनएचएआयकडून केला जात आहे तर हा संपूर्ण प्रकल्प चार टप्प्यात असून त्यात ४० हजार झाडांचा बळी जाणार असल्याची भीती पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
एनएचएआयच्या कृती आराखड्यातून पर्यावरणवाद्यांच्या दाव्याला बळ मिळाल्याचे लक्षात येत आहे. संपूर्ण आयएमएस प्रकल्प चार टप्प्यात असून ५०० एकरामध्ये हाेणार आहे. यामुळे अजनी वनाचा परिसरच नाही तर कारागृह, नीरी, एफसीआय, धनवटे काॅलेजचा परिसर प्रभावित हाेणार आहे. इतक्या संख्येत वृक्षताेड लक्षात येऊ नये म्हणून प्रकल्पाचे तुकड्यांमध्ये विभाजन करून दर्शविण्यात येत असल्याचा आराेप पर्यावरणवाद्यांनी केला आहे. ही वृक्षताेड करताना पर्यावरण क्लियरन्स घेणे आवश्यक आहे. मात्र एनएचएआयने त्यातूनही वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे.
असे आहेत प्रकल्पाचे चार टप्पे
पहिला टप्पा : आयएमएस-१ : ४४ एकर जागा. जुने क्वार्टर्स व रेल्वे वर्कशाॅप असलेले अजनीवन परिसर. यामध्ये ४५२२ झाडे कापण्याचे प्रस्तावित आहे. यासह अजनी आयएमएस-रहाटे काॅलनी ते नीरीपर्यंत वर्धा राेडशी जाेडणाऱ्या फ्लायओव्हरमध्ये ४०८ झाडे कापली जाणार आहेत.
दुसरा टप्पा : आयएमएस-२ : धनवटे नॅशनल काॅलेज व आसपासचा परिसर. एकूण ४८ एकर जागा. यामध्ये ४००० झाडे ताेडली जातील.
तिसरा टप्पा : कमर्शियल बिझनेस डेव्हलपमेंट (सीबीडी-१). एकूण सेंट्रल जेलची ११७ एकर व एफसीआयची ३४ एकर जागा. माॅल्स, तीन तारांकित, पंचतारांकित हाॅटेल्स, रेस्टाॅरेंट, दुकाने आदींच्या कामासाठी. यामध्ये १३००० झाडे बळी जातील.
- चाैथा टप्पा : सीबीडी-२ साठी. मैदानापर्यंत असलेली रेल्वेची जागा व रिकामे प्लाॅट प्रस्तावित असल्याची माहिती. एकूण २३७ एकर जागा घेण्यात येईल. यामध्ये तब्बल २०००० झाडांचा बळी जाणार आहे.