४०२ कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाइन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:38+5:302021-06-04T04:06:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील दोन महिन्यांपासून कोरोना साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात लागू असलेल्या ...

402 crore electricity bill payment online | ४०२ कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाइन

४०२ कोटी रुपयांचा वीजबिल भरणा ऑनलाइन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील दोन महिन्यांपासून कोरोना साथ रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊन काळात लागू असलेल्या प्रतिबंधामुळे महावितरणकडून देण्यात आलेल्या वीज देयकाचा भरणा वीजग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने केला आहे. जानेवारी ते मे-२०२१ या काळात नागपूर परिमंडळात येणाऱ्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील वीजग्राहकांनी तब्बल ४०२ कोटी रुपयांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने केला आहे.

नागपूर शहरातील वीजग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळात २९८ कोटी रुपयांची देयके ऑनलाइन पद्धतीने भरली आहेत. एप्रिल महिन्यात नागपूर शहरातील २ लाख ८० हजार ६३८ वीजग्राहकांनी ५२ कोटी ९ लाख रुपयांचा भरणा, तर मे महिन्यात ३ लाख २५ हजार ३८० वीजग्राहकांनी ७५ कोटी ६८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. जानेवारी ते मे-२०२१ या काळात शहरातील १४ लाखापेक्षा अधिक वीजग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीचा वापर करीत वीज देयकाचा भरणा केला आहे. नागपूरच्या ग्रामीण भागातही वीजग्राहकांचा ऑनलाइन पद्धतीने वीज देयकाची रक्कम भरण्याचा कल वाढू लागला आहे. मे महिन्यात प्रतिबंध असल्याने ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घराबाहेर पडून वीज देयकाची रक्कम भरण्यासाठी वीजबिल भरणा केंद्रावर जाणे शक्य नव्हते. परिणामी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ७९,६५९ वीजग्राहकांनी त्यांच्याकडे असलेली १२ कोटी ३७ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने महावितरणच्या तिजोरीत जमा केली. एप्रिल महिन्यात ६२,६९९ वीजग्राहकांनी ८ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम जमा केली. जानेवारी ते मे-२०२१ या काळात ग्रामीण भागातील सुमारे साडेतीन लाख वीजग्राहकांनी ५७ कोटी ४१ लाख रुपयांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने केला.

नागपूर जिल्ह्यासोबतच वर्धेतील वीजग्राहकांचा ऑनलाइन पद्धतीने वीज देयकाची रक्कम भरण्याकडे कल वाढू लागला आहे. जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत वर्धा जिल्ह्यातील २ लाख ७८ हजार वीजग्राहकांनी २६ कोटी पेक्षा अधिक रकमेचा भरणा ऑनलाइन पद्धतीने केला आहे. संपूर्ण मे महिन्यात वर्धेत संचारबंदी असताना वर्धेतील ६६ हजार ८०१ वीजग्राहकांनी जवळपास ४७ कोटी रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने महावितरणकडे जमा केली.

Web Title: 402 crore electricity bill payment online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.