२३ दिवसांत तोडले ४०४४ वीज कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:07 AM2021-07-25T04:07:21+5:302021-07-25T04:07:21+5:30
नागपूर : थकबाकी वसुलीच्या मोहिमेला महावितरणने आणखी गती दिली असून, जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात ४०४४ ग्राहकांचे वीज कनेक्शन ...
नागपूर : थकबाकी वसुलीच्या मोहिमेला महावितरणने आणखी गती दिली असून, जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात ४०४४ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शहरातील आणखी हजारो ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास त्यांचे कनेक्शनही तोडण्यात येणार आहे.
महावितरणच्या आकडेवारीनुसार नागपूर शहर परिमंडळात या महिन्यात सर्वाधिक १३२६ कनेक्शन महाल विभागातील तोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कॉंग्रेसनगर विभागात ८६२, सिव्हिल लाइन्समध्ये ८७१ आणि गांधीबाग विभागातील ५३१ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शाखा कार्यालयापासून परिमंडळ कार्यालयातील कर्मचारी याच कामाला लागले आहेत. संवेदनशील परिसरात पोलिसांच्या मदतीने कनेक्शन तोडण्यात येत आहेत. दीर्घ कालावधीपासून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांची वीज कापण्यास प्राधान्य द्यावे, असा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आला असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. परिमंडळात दोन लाखांहून अधिक ग्राहकांकडे विजेची थकबाकी आहे. आता उर्वरित थकबाकीदार असलेल्या ग्राहकांची वीज कापण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे अभियंता आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यांच्या मते अशी मोहीम मार्चमध्ये सुरू असते; परंतु यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये कारवाई होत आहे. यामुळे वितरण यंत्रणेवर लक्ष देण्यास कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे.
............
दागिने गहाण ठेवताहेत नागरिक
विजेचे बिल नियमितपणे भरले पाहिजे यात दुमत नाही; परंतु महावितरणच्या कार्यालयात पोहोचत असलेल्या थकबाकीदारांचा त्रासही मोठा आहे. नागरिकांच्या मते कोरोनाच्या काळात मिळकत बंद झाल्यामुळे ते बिल भरू शकले नाहीत. कंपनीच्या कार्यालयात गेलेल्या एका दांपत्याने सांगितले की, घरातील सर्वच जण कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यांच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च झाले. त्यामुळे बिल भरू न शकल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले, तर वीज कनेक्शन तोडल्यानंतर बिल भरण्यासाठी दागिने गहाण ठेवल्याचे एका महिलेने सांगितले.
थकबाकी भरून कारवाईपासून बचाव करा : महावितरण
महावितरणच्या मते, आर्थिक स्थिती खराब झाली असल्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण प्रदेशात थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. थकबाकीदारांनी थकबाकी भरून कारवाईपासून बचाव करावा.
.............