नागपुरातील ४१ हजारावर शेतकरी होणार भूमिस्वामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 09:52 PM2018-04-19T21:52:13+5:302018-04-19T21:52:36+5:30
विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता भूमिस्वामी होणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता भूमिस्वामी होणार आहेत. एकट्या नागपुरातील ४१,७४६ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून ते आता भूमिस्वामी होतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.
मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बुधवारी वर्ग दोनच्या अशा भूमिधारी जमिनी आता भूमिस्वामी म्हणून रूपांतरित करून शेतकऱ्यांना त्या जमिनीचे स्वामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या जमिनीचा धारणाधिकार बदलताना शुल्क आकारण्याची तरतूद रद्द करून यासाठी कोणतीही रक्कम न आकारता शासनानेच ही प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून हा विषय प्रलंबित होता. गेल्या १५ वर्षांपासून आम्हीही हा विषय सभागृहात लावून धरला होता. त्याला यश आले असून नागपूरसह भंडारा व गोंदियातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नागपुरात एकूण १ लाख २२ हजार ३६७ वर्ग २ खातेदारांची संख्या आहे. यापैकी मार्च २०१८ पर्यंत वर्ग १ मध्ये ८०,६२१ प्रकरणे रूपांतरित झाली आहेत. तब्बल ४१, ७४६ प्रकरणे शिल्लक आहेत. ती सर्व आता वर्ग एक मध्ये रूपांतरित होतील.
पत्रपरिषदेला आ. समीर मेघे,. आ. सुधीर पारवे, आ. गिरीश व्यास, अशोक धोटे, अशोक मानकर, डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.