४१ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:15 AM2017-09-19T00:15:04+5:302017-09-19T00:15:23+5:30
शाळा सुरू होऊन चार महिने लोटल्यानंतरही ४१ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळा सुरू होऊन चार महिने लोटल्यानंतरही ४१ हजार विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतीक्षा आहे. मात्र शिक्षण विभागाने गणवेशासाठीचे २ कोटी ९२ लाख रुपये शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केले आहे. जिल्ह्यात ७३ हजारावर विद्यार्थी गणवेशाचे लाभार्थी आहेत. अद्यापपर्यंत ३१ हजार विद्यार्थ्यांच्या खात्यात गणवेशाचे अनुदान वळते केले आहे, अशी माहिती शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आली.
सभापती उकेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेत झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत पुन्हा सदस्यांनी गणवेशाचा विषय मांडला. बैठकीत शिक्षण विभागाने गणवेशाच्या बाबतीत आकडेवारी दिली. तसेच जि.प. ग्राम पंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने गणवेशाचे अनुदान वाटप बंद असल्याचे सांगितले. यावर शिक्षण समितीचे सदस्य शांता कुमरे, भारती गोडबोले, पुष्पा देशभ्रतार, सुधाकर ढोणे, गोपाळराव खंडाते यांनी आक्षेप घेत गणवेश पुढल्या वर्षासाठी तर देणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला. गणवेशासाठी विद्यार्थ्यांचे खाते उघडण्याचे काम तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व शाळा व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले होते. त्याउपरांत १०० टक्के डीबीटी होऊ शकली नाही. यात प्रशासन दोषी असल्याचा आरोपसुद्धा सदस्यांनी केला. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येते. गतवर्षी सायकल वाटप न झाल्याने यंदा २०१६-१७ व २०१७-१८ या दोन्ही वर्षाच्या २,४८८ सायकल वाटप केले जाणार आहे. सध्या सर्व सदस्यांनी आपापल्या क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या याद्या विभागाकडे सुपूर्द केल्या असून, प्रशासनाकडे पाठविल्याची माहिती शिक्षण सभापती उकेश चव्हाण यांनी दिली.