विटभट्टीवरील ४१ कामगारांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:09 AM2021-05-19T04:09:27+5:302021-05-19T04:09:27+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : कवठा (ता.कामठी) शिरावातील विटांच्या भट्टीवर मालकाने ४१ कामगारांना बंदिस्त केल्याची तक्रार कामगार आयुक्तांकडे करण्यात ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कवठा (ता.कामठी) शिरावातील विटांच्या भट्टीवर मालकाने ४१ कामगारांना बंदिस्त केल्याची तक्रार कामगार आयुक्तांकडे करण्यात आली हाेती. कामगार आयुक्तांच्या आदेशाचे पालन करीत, महसूल व पाेलीस विभागातील अधिकाऱ्यांनी साेमवारी (दि.१७) सायंकाळी या भट्टीची पाहणी केली आणि तेथील ४१ कामगारांची सुटका केली. त्या कामगारांना त्यांच्या स्वगृही पाठविण्याची व्यवस्थाही प्रशासनाने केली.
प्रेमलाल जुगुले यांची कवठा शिवारात विटांची भट्टी असून, त्या भट्टीवर नऊ कुटुंबांतील ४१ कामगार काम करायचे. काेराेना संक्रमणामुळे त्या कामगारांना त्यांच्या मूळ गावी जायचे हाेते. त्यामुळे त्यांनी प्रेमलाल जुगुले यांनी गावी जाण्याची परवानगी द्यावी, अशी अनेकदा विनंती केली. जुगुले याने कामगारांना गावी जाण्याची परवानगी देण्याऐवजी त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध भट्टीवर बंदिस्त केले. या प्रकाराबाबत नागपूर येथील कामगार आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली हाेती. या तक्रारीची दखल घेत कामगार आयुक्तांनी या प्रकरणाची शहानिशा व तेथील कामगारांची सुटका करण्याचे कामठी तालुका प्रशासनाला आदेश दिले.
त्या अनुषंगाने कामगार आयुक्त कार्यालय, कामठी तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह व काेराडी (ता.कामठी) पाेलिसांनी साेमवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास या भट्टीला प्रत्यक्ष भेट देत पाहणी केली. या पथकाने सर्व कामगारांची प्रेमलाल जुगुले यांच्या तावडीतून सुटका केली आणि त्यांना त्यांच्या मूळ गावी सुखरूप जाण्यासाठी बसची व्यवस्था करवून दिली. या प्रकरणात पुढील कारवाई कामगार आयुक्त कार्यालयामार्फत केली जाणार असल्याची माहिती तहसीलदार अरविंद हिंगे यांनी दिली. ही कारवाई तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या नेतृत्वात कामगार अधिकारी संजय घासल, कनिष्ठ कामगार अन्वेषक आर.यावलकर, अभिषेक साखर, गायत्री दुबे, कोराडीचे मंडळ अधिकारी (महसूल) जयवर्धन महानाम, म्हसाळाचे तलाठी पद्माकर अगण, कवठा ग्रामपंचायत कर्मचारी श्रीराम डबले, पोलीस पाटील उद्धव कुहिटे यांच्यासह काेराडी पाेलिसांनी केली.