२११ ठिकाणी ४१३ विसर्जन तलाव; नागपुरात बाप्पांच्या निरोपाची तयारी पूर्ण
By मंगेश व्यवहारे | Published: September 27, 2023 07:49 PM2023-09-27T19:49:46+5:302023-09-27T19:49:57+5:30
गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे.
नागपूर : गुरूवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीला श्रीगणेशाचे विसर्जन होणार आहे. नागपूरकरांनी स्थापना केलेल्या लाडक्या बाप्पांच्या निरोपाची मनपाद्वारे तयारी पूर्ण झालेली आहे. शहरातील दहाही झोनमधील वेगवेगळ्या २११ विसर्जनस्थळी एकूण ४१३ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आलेली असून यामध्ये १९ फिरत्या विसर्जन तलावांचा देखील समावेश आहे. ४ फुटापेक्षा मोठ्या आकाराच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी कोराडी येथील विशाल कृत्रिम तलावामध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील सर्व तलावांमध्ये विसर्जनाला पूर्णत: बंदी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी मनपातर्फे शहरातील प्रमुख तलावांचे परिसर तसेच अन्य ठिकाणी एकूण ४१३ कृत्रिम विसर्जन टँकची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव, सोनेगाव तलाव, गांधीसागर तलाव, पोलिस लाईन टाकळी तलाव, सक्करदरा तलाव, नाईक तलाव या तलावांच्या परिसरामध्ये विसर्जन टँक उभारण्यात येत आहेत. या विसर्जन टँकमध्ये ४ फुट किंवा त्यापेक्षा कमी आकाराच्या मूर्तींचे विसर्जन केले जाणार आहे. सर्व विसर्जन स्थळी निर्माल्य संकलनासाठी देखील विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. नागरिकांनी श्रीगणेशाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यापूर्वी त्यांचे निर्माल्य काढून ते निर्माल्य कलशामध्ये जमा करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात येत आहे.
आयुक्तांनी दिले निर्देश
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व विसर्जनस्थळी आवश्यक त्या सर्व सुविधा सज्ज ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. कृत्रिम टँकमध्ये वापरले जाणारे पाणी तसेच विसर्जीत मूर्तींची सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली जाईल, याची काळजी घेण्यात यावी, सर्व विसर्जन स्थळी निर्माल्य कलशांची व्यवस्था तसेच परिसरात नियमित स्वच्छता राखली जावी यादृष्टीने स्वच्छता कर्मचा-यांची नेमणूक करण्याचे त्यांनी निर्देशित केले.
फुटाळ्यावर ग्रीन व्हिजीलचे ९ वर्षांपासून सहकार्य
मनपाच्या या कार्यात शहरातील स्वयंसेवी संस्थांचे देखील सहकार्य मिळते. फुटाळा तलाव परिसरात विसर्जनस्थळी मागील ९ वर्षांपासून ग्रीन व्हिजील फाउंडेशनद्वारे मनपाला सहकार्य केले जात आहे. यावर्षीही ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैसवाल, मेहुल कोसुरकर, बिष्णुदेव यादव, शीतल चौधरी, श्रीया जोगे, तुषार देशमुख, संस्कार माहेश्वरी, मिताली पांडे, आदर्श सिन्हा, प्रतीक्षा मेथी, कृष्णा चितलांगे, अनुज श्रीवास्तव, प्रियांशी आचार्य, वरुण मंत्री, अर्णव डेकाटे, राहुल मिश्रा, अंकित भड आदी सहकार्य करीत आहेत.